मुंबई- सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस या कंपनीतून जप्त केलेल्या कोट्यवधीच्या इफेड्रिनप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्कर विकी गोस्वामी आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्यासह एकूण सात फरार आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक केली असून दोन साक्षीदारांच्या जबाबाच्या अाधारे ही कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आता बॉलीवूडमधील आणखीही काही मोहरे पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्याविरोधातही पुरावे गोळा केले जात असल्याचा धक्कादायक खुलासा ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी शनिवारी ठाणे पोलिस अायुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
सागर पोवळे आणि मयूर सुखदरे या दोन ठाणेस्थित आरोपींच्या अटकेनंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अाधारे ठाणे पोलिसांनी सोलापूर येथील चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन लाइफ सायन्सेस या कंपनीतून तब्बल २३ टन इफेड्रिन जप्त केले. याप्रकरणी अधिक तपासातून सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या या इफेड्रिनचे धागे थेट आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांचा तस्कर विकी गोस्वामीपर्यंत पोहोचले. गाेस्वामीच्या यंत्रणेमार्फत हे इफेड्रिन थेट युरोप आणि आफ्रिकेत पोहोचत असल्याची तसेच या तस्करीत हिंदी चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचाही सक्रिय सहभाग असल्याचे तपासात आढळून आले. याप्रकरणी अटकेत असलेल्या मनोज जैन आणि जय मुखी या दोघांनी न्यायालयासमोरच विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णीचा या प्रकरणातील सहभाग स्पष्ट केला. या तस्करीची पाळेमुळे खोलवर रुजली असून ममता कुलकर्णीने केनियातील मोंबासा शहरातील हॉटेल ब्लिस आणि दुबईच्या बुर्ज खलिफा या आलिशान हॉटेलमध्ये गुप्त बैठका घेतल्याचा वृत्तांत समोर आला आहे. मुख्य आरोपी विकी गोस्वामी याचा निकटवर्तीय असलेल्या डॉ. अब्दुल्लाच्या टांझानियामधील मे. सबुरी फार्मा या कंपनीच्या पत्त्यावर हे इफेड्रिन पाठवून तेथे मेथएमफेटामाइन हा अमली पदार्थ तयार केला जात असे. त्याच्या बदल्यात मिळणारी कोट्यवधी रुपयांची रोकड हवालाच्या माध्यमातून भारतात पोहोचवली जात असल्याची माहिती परमवीर सिंग यांनी दिली.
ममताच्या नावे ११ लाखांचे शेअर्स?
पन्नास हजार डॉलर प्रतिकिलो दराने विकल्या या अमली पदार्थाची जगभर विक्री करण्याची टोळीची योजना होती. तसेच सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस या कंपनीच्या दोन कोटी रुपयांच्या शेअर्सपैकी अकरा लाखांपेक्षा जास्त शेअर्स ममता कुलकर्णीच्या नावे करून तिलाही या कंपनीचे संचालक बनवण्याची योजना होती. याबाबतचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचे ठाणे पोलिस आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.
विकी गोस्वामीसह सात आरोपी फरार
सध्या याप्रकरणी सागर पोवळे, मयूर सुखदरे, राजेंद्र डिमरी, धनेश्वर स्वामी, पुनीत शृंगी, मनोज जैन, हरदीपसिंग गिल, नरेंद्र काचा, बाबासाहेब शंकर धोत्रे आणि जय मुखी हे दहा जण अटकेत असून विकी गोस्वामी, ममता कुलकर्णी, डॉ. अब्दुल्ला, त्याचे दोघे साथीदार तसेच गुजरातच्या नेत्याचा मुलगा किशोर राठोडसह सात जण फरारी आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन वाचा.. या चित्रपटांमध्ये केले आहे ममता कुलकर्णीने काम..,
सोलापूरमध्ये काय झाले होते.., ममतावर संशय का.., कोण आहे विकी गोस्वामी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)