आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेकणी माणूस आयर्लंड पंतप्रधानपदाच्या शर्यतीत! डॉ. लिओ मालवण तालुक्यातील वराड गावचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयर्लंड पंतप्रधानपदाच्या शर्यतीत चक्क एक मालवणी माणूस असून डाॅ. लिओ वराडकर हे त्यांचे नाव. मालवण तालुक्यातील वराड या गावी ते तीन वर्षांपूर्वी येऊन गेले होते. सध्या लिओ आयर्लंड मंत्रिमंडळात समाजकल्याण खाते सांभाळत असून पंतप्रधान एंडा केनी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आता सत्ताधारी फाइन गिल पक्षात पंतप्रधानपदासाठी  शर्यत सुरू असून यात वराडकरांचे नाव आघाडीवर आहे.    
 
लिओ यांचे वडील डाॅ. अशोक वराडकर हे १९६० मध्ये इंग्लंडला गेले. नंतर इंग्लंड ते आयर्लंड असा प्रवास करत त्यांनी आयर्लंडला कायमच्या निवासासाठी प्राधान्य दिले. वराडकर कुटुंबीय हे वराड गावच्या देऊळवाडीतील. हे कुटुंब अतिशय सुशिक्षित!  लिओचे एक काका अविनाश वराडकर हे जिल्हाधिकारी होते, तर दुसरे शामराव  हे मुख्यमंत्र्यांचे सचिव राहिले आहेत. वैद्यकीय व्यवसायासाठी १९७३ मध्ये आयर्लंडमध्ये स्थायिक झाल्यानंतर लिओच्या वडिलांनी तेथेच मरिअम नामक नर्सशी लग्न केले. त्यांना तीन अपत्ये अाहेत. १९७८ मध्ये डब्लिनमध्ये लिओ यांचा जन्म झाला.    
 
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ३८ वर्षीय वराडकर यांच्यासमोर गृहनिर्माणमंत्री  सिमोन कोवेनी यांचे आव्हान आहे. मात्र, वराडकरांना पाठिंबा वाढत असल्याने त्यांचे नाव पुढे असल्याचे मानले जाते. फाइन गिल पक्षाकडे असलेली ७१ पैकी ४५ मते वराडकर यांच्याकडे असून २ जूनला पंतप्रधानांची निवड होणार आहे. एकदा फाइन गिलने नेत्याची निवड केल्यानंतर आयर्लंड पार्लमेंटमध्ये यावर मतदान होऊन पंतप्रधानांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
 
डाॅक्टर राजकारणी  
लिओ हे डब्लिनच्या ट्रिनिटी काॅलेजमध्ये आधी कायद्याचे शिक्षण घेत होते, मात्र नंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षणाकडे जाण्याचा निर्णय घेतला. काॅलेजमध्ये असतानाच  यंग फाइन गिल पक्षाच्या कामात त्यांनी रुची दाखवायला सुरुवात केली. २००३ मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्युनियर डाॅक्टर म्हणून त्यांनी बरीच वर्षे उमेदवारी करण्यावर भर दिला. सन २०१० मध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने डाॅक्टरी करण्यास सुरुवात केली. हे करत असताना राजकारणातही आपले पाय त्यांनी रोवले.    

वराड शांतचित्त    
डाॅ. लिओ यांचे वराडमधील घर सध्या बंद असते. तीन वर्षांपूर्वी ते आपल्या गावी आले होते तेव्हा घर उघडले होते. त्या वेळी साफसफाई झाली. मुंबईतील त्यांच्या कुटुंबीयांपैकी काही सदस्य कधीतरी गावाला जात असतात. लिओ हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याची बातमी वराडमध्ये फारशी कोणाला माहिती नव्हती. मात्र, त्यांच्या शेजारच्या लोकांना ही माहिती कळताच त्यांनी आनंद व्यक्त केला; पण एवढे वगळता हे छोटेसे गाव शांतचित्त दिसले.   
बातम्या आणखी आहेत...