आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Manikrao And Chief Minister Bargaing Before The Rahul Gandhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माणिकराव, मुख्यमंत्र्यांमध्ये राहुल गांधींसमोर तू तू- मैं मैं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस राष्‍ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्ली येथे गेल्या आठवड्यात घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यातील मतभेद समोर आल्याचे समजते. ‘काँग्रेस आमदारांना मुख्यमंत्र्यांकडून पाहिजे तेवढा न्याय मिळत नाही’, असे माणिकरावांनी वरिष्ठांसमोर सांगितले तर, ‘सरकारच्या विविध योजना आमदार, काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांपर्यंत नेत नाहीत,’ अशी उलट तक्रार मुख्यमंत्र्यांनी केली.

राहुल गांधी यांच्यासमोर आमदारांच्या समस्या मांडताना माणिकरावांनी राज्यात मुख्यमंत्र्यांकडून पाहिजे ते सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले. लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघांना जास्त निधी उपलब्ध करून देणे, त्यांची कामे प्राधान्याने करणे, या गोष्टी अजूनही घडत नाहीत. त्यामुळे आमदारांना मतदारसंघामध्ये ताकद मिळणार कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याउलट मुख्यमंत्र्यांनी मात्र सरकारने घेतलेले विविध लोकप्रिय निर्णय, योजना यांची माहिती आमदार तळागाळामध्ये, त्यांच्या मतदारसंघामध्ये पोहोचवत नसल्याचे सांगत आमदारांकडे बोट दाखवले.

प्रकाश यांच्याकडून तक्रारी- याआधीही कॉँग्रेस केंद्रीय समितीच्या बैठकीत महामंडळांवर नियुक्त्या न केल्याबद्दल राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी वरिष्ठांसमोरच मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने अद्याप अध्यक्ष दिलेला नाही. त्यामुळे कार्यकर्तेही दिशाहीन असल्याचे त्यांचे म्हणणे होते.


सर्वच बाजूंनी कोंडी- पक्षातील आमदारांचा एक गट आधीपासूनच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असून वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. आपली कामे होत नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या तुलनेत कमी निधी काँग्रेसच्या आमदारांना आपल्या जिल्ह्यासाठी मिळतो. सरकारी योजना जिल्ह्यामध्ये राबवतानाही धिम्या गतीने कामे मुख्यमंत्र्यांच्या दरबारी होतात, असा तक्रारींचा पाढा काँग्रेस आमदार वाचत असतात. अशावेळी प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, आमदार अशा सगळ्यांची नाराजी ओढावून घेतलेल्या मुख्यमंत्र्यांपुढे राज्याचे नेतृत्व करताना अडचणींचा डोंगर आहे.