मुंबई - शेतकर्यांची गरज लक्षात घेता व्यापार्यांनी कवडीमोल भावात कापूस खरेदी सुरू केली आहे. शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने हमीभाव जाहीर करून तातडीने कापूस खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
अपुर्या पावसामुळे यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे पीक आलेच नाही. तर धान उत्पादक पट्ट्यात अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे या दोन्ही पिकांचे उत्पादन करणारे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. या शेतकर्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
काँग्रेसने केंद्रात सेवा हमी विधेयक आणले होते. तेच विधेयक फडणवीस सरकार आणू पाहत आहे. मात्र, नव्या विधेयकाला तपासून ते जनतेच्या आशा-अपेक्षांना पूर्ण करणारे असल्यास काँग्रेस पक्ष राज्य सरकारला सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.