आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातील पुरावे आपल्यासमक्ष नष्ट केले, 6 अाराेपींना 14 दिवस काेठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - मंजुळा शेट्येची हत्या केल्यानंतर तिच्या बराकीतील सांडलेले रक्त आणि तिच्यावर अत्याचार करण्याकरिता वापरण्यात आलेली काठी तसेच इतर काही हत्यारे माझ्यासमोर इतर कैद्यांना सांगून नष्ट करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा तुरुंगात असलेले आमदार रमेश कदम यांनी महानगर मुख्य दंडाधिकाऱ्यांसमोर शुक्रवारी केला. दरम्यान, न्यायाधीशांनी या प्रकरणातील सहा आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.  
 
अामदार कदम सध्या अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी भायखळा तुरुंगातच आहेत.  मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी आपली साक्ष नोंदवण्यात यावी, असा अर्ज त्यांनी केला होता. त्यानुसार शुक्रवारी त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. मंजुळा शेट्ये हिची हत्या केल्याच्या दिवशी संध्याकाळी सहानंतर हत्येची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मदतीने कारागृह पोलिस अरुण जाधव आणि बनसोडे यांनी बॅरेकची साफसफाई केली. तर कैदी गुलाब यादव, चंद्रकांत यादव, सुभाष यादव आणि कैदी मंडल यांच्या मदतीने मारहाणीसाठी वापरण्यात आलेली काठी आणि इतर पुरावे नष्ट केल्याचा खळबळजनक आरोप आमदार रमेश कदम यांनी केला आहे. आपल्या समोर हा सर्व प्रकार घडला असल्याने या हत्या प्रकरणात कलम १६४ अंतर्गत आपला जबाब नोंदवावा, अशी मागणीही त्यांचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी केली आहे.   
 
सरकारी पक्ष पाेलिस काेठडीसाठी अाग्रही नाही  
धक्कादायक बाब म्हणजे एरवी सरकारी वकील आरोपींच्या पोलिस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद करतात, शुक्रवारी मात्र शेट्ये हत्या प्रकरणातील आरोपींच्या पोलिस कोठडीसाठी कसलाही युक्तिवाद न करता सरकारी पक्षाने आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. विशेष म्हणजे हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार आणि इतर महत्त्वाचे पुरावे अजूनही सापडले नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले होते. तसेच या प्रकरणात आणखीही काही आरोपी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या शिवाय आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत, आणखी साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत असा युक्तिवाद करण्यात आला होता. असे असताना आजच्या सुनावणीदरम्यान यापैकी एकाही मुद्द्यांवर युक्तिवाद झाला नाही.
बातम्या आणखी आहेत...