आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅनरवरही नकोसे झाले ‘सर’; सदा सरवणकर, राहुल शेवाळे यांनी काढले बॅनर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनोहर जोशी आणि शिवसेनेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. नुकताच जोशी सरांच्या विरोधकांनी त्यांना तीव्र विरोध दाखवून दिला आहे. सदा सरवणकर व राहुल शेवाळे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोशी यांची छायाचित्रे असलेले एक बॅनर काढून त्या ठिकाणी ठाकरे कुटुंबीयांची छायाचित्रे असल्याचे बॅनर लावले. दिवाळीच्या वस्तंूची विक्री करणार्‍या एका स्टॉलवर हे बॅनर लावण्यात आले होते.

दादरमध्ये एका ठिकाणी दिवाळीच्या वस्तू विक्रीसाठी एका दांपत्याने स्टॉल लावला होता. त्या स्टॉलवर त्यांनी त्यांच्याकडे असलेले गेल्या वर्षीचे बॅनर लावले. या बॅनरवर जोशी सरांचे छायाचित्र होते. पण काही वेळातच मनोहर जोशींना विरोध असणारे शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले. त्यामुळे शिवसेना नेते सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोशी यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावल्याच्या कारणावरून गोंधळ सुरू केला. त्यांनी ते बॅनर काढले व त्या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव आणि आदित्य यांची छायाचित्रे असलेले बॅनर झळकावले. शिवसेना नेते सदा सरवणकर आणि राहुल शेवाळे यांनी हे बॅनर तयार केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकांसाठी राहुल शेवाळे यांचे नाव समोर आल्याने जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे शिवसेना नेतृत्वासह नेते त्यांच्यावर नाराज आहेत.

दुसर्‍या स्टॉलकडे दुर्लक्ष
या स्टॉलपासून काही अंतरावर दुसर्‍या स्टॉलवरही जोशी यांचा फोटो असलेले बॅनर होते. पण त्याला कार्यकर्त्यांनी हातही लावला नाही. त्या ठिकाणी जोशी यांचे समर्थक असल्याने वाद टाळण्यासाठी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असण्याची शक्यता आहे.