मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पक्षातील ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यावर खप्पा मर्जी कायम असून, लोकसभा निवडणूकीच्या जागावाटप करण्यासाठी महायुतीकडून स्थापन केलेल्या समन्वय समितीतून पंतांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यात झालेल्या अपमाननाट्यानंतर चार-पाच दिवस अज्ञातवासात गेल्यानंतर जोशी यांनी मुंबईत परताच उद्धव यांना पत्र लिहले होते. तसेच या पत्राची आपण वाट पहात असल्याचे म्हटले होते. मात्र, उद्धव यांनी जोशींना अद्याप उत्तर दिले नसून, त्यांचे जाणून बुझून महत्त्व कमी करीत आहेत. मात्र, येत्या 13 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे व जोशी यांचा भेट वानखेडे स्टेडियमवर होईल असे सांगण्यात येत आहे.
जोशी यांना महायुतीच्या समन्वय समितीतून डच्चू दिल्यामुळे त्यांना सेनेच्या नेतृत्त्वापुढे लोटांगण घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे उद्धव यांची भेट घेण्यासाठी मनोहर जोशींना 13 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. येत्या 14 नोव्हेंबरला सचिन तेंडूलकरचा ऐतिहासिक असा 200 कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.वत्याच्या एक दिवस अगोदर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेल्या पत्रकार कक्षाचे उद्घाटन शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यावेळी एमसीएचे माजी अध्यक्ष व सदस्य या नात्याने मनोहर जोशी तेथे उपस्थित असतील. त्यावेळी पवारांच्या उपस्थितीत उद्धव-पंत गळाभेट होईल असे सांगितले जात आहे. मात्र, उद्धव जोशींना कसा प्रतिसाद देतात यावर अवलंबून असेल. सेनेतील सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव हे जोशींना जितके टाळता येईल तितके टाळण्याचा प्रयत्न करतील. मात्र, समोरासमोर आलेच तर एकमेंकाना नमस्कार करतील. मात्र ते गळाभेट घेणार नाहीत. जोशींनी ठाकरे यांना पत्र पाठवून 15 दिवस उलटून गेले तरी काहीही उत्तर दिले नाही. याबाबत योग्य वेळी बोलेन, यात प्रतिक्रिया देण्यासारखे काही नाही, असे सांगून उद्धवजी जोशींना शक्य तेवढे टाळत आहेत. त्यामुळे जोशींना सेनेने राजकीय वनवासात पाठविल्यात जमा आहे.