आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मातोश्री’वर जायला पंतांनी साधला दिवाळीचा मुहूर्त; रिपाइंला जागा देण्यास उद्धव राजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका केल्याने दसरा मेळाव्यात व्यासपीठावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढवून घेतलेले शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिवाळसणाचे टायमिंग साधत रविवारी ‘मातोश्री’वर हजेरी लावली. जोशी यांच्या या अकस्मात हजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना जोशी म्हणाले, ‘मी पक्षावर बिल्कुल नाराज नाही. ठाकरे कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. आज कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सविस्तर चर्चेसाठी लवकरच वेळ देण्यात येईल, असे उद्धव यांनी मला सांगितले आहे.’

शिवसेनेच्या संयमी नेतृत्वामुळे बाळासाहेबांचे स्मारक रखडल्याची टिपण्णी जोशी यांनी दादरच्या एका कार्यक्रमात केली होती. जोशी यांनी थेट पक्षप्रमुखांवरच तीर सोडल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले होते. त्याचे पडसाद दसरा मेळाव्यात उमटले. शिवसैनिकांच्या घोषणाबाजीनंतर जोशींना अपमानास्पदरीत्या मेळावा सोडून जावे लागले होते. दरम्यान, त्यानंतर उद्धव यांची नाराजी दूर करण्यासाठी जोशींनी दोनपानी खुलासा पाठवला. परंतु उद्धव यांनी त्याला कोणतेही प्रत्युत्तर दिले नव्हते. त्यामुळे जोशी आणि उद्धव यांच्यातील संबंध ताणले गेले होते.

‘मेळाव्यातील प्रकार पूर्वनियोजित होता. मी शिवसैनिक आहे. मी माफी मागणार नाही,’ असा पवित्रा जोशी यांनी कायम ठेवला होता. महिनाभरात जोशी यांना ‘मातोश्री’वरून बोलावणे आले नाही. त्यामुळे जोशी यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र दिवाळीचा मुहूर्त साधत जोशी यांनी आज सर्वांनाच चकवा दिला. सकाळी ते ‘मातोश्री’वर पोचले. उद्धव आणि त्यांच्या परिवारांना शुभेच्छा दिल्या. ते सुमारे तासभर ‘मातोश्री’वर होते. कार्यकर्त्यांची गर्दी असल्यामुळे उद्धव यांच्याशी त्यांची सविस्तर चर्चा होऊ शकली नसल्याचे जोशींनी नमूद केले.

सरांचे तेल गेले, तूपही गेले
जोशी यांना दक्षिण मध्यमधून (दादर) लोकसभेची उमेदवारी हवी होती. परंतु उद्धव यांनी त्यास नकार दिला. कल्याणचा पर्यायही अधांतरी ठेवण्यात आला. या उद्विग्नतेमधून जोशी यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या या बंडामुळे उमेदवारी दूरच, त्यांचे स्वपक्षातील स्थानही धोक्यात आले आहे.