आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवारी, अमराठी उमेदवाराचा प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आठ जागांसाठी 27 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मुंबईतून भाजपतर्फे नगरसेवक मनोज कोटक यांनी आज आपला अर्ज दाखल केला आहे. मुंबई महापालिकेच्या दोन जागा आहेत. शिवसेनेतर्फे शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजयासाठी पहिल्या फेरीत 75 मतांची गरज असल्याने रामदास कदम यांचा विजय निश्‍चित आहे. मात्र, भाजपला विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. जो उमेदवार पैसा जास्त फेकेल तोच विजयी होईल असे येथे गणित मांडले जात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून गेलेले आठ सदस्य 1 जानेवारी 2016 रोजी निवृत्त होत आहेत. त्या आठ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मुंबईतून शिवसेनेने कदम यांना संधी दिल्यानंतर भाजप कोणाला संधी देते हे महत्त्वाचे होते. शायना एनसी व मनोज कोटक यांची नावे चर्चेत होती. मात्र, भाजपचा उमेदवार विजयी होईल की नाही याची खात्री नसल्याने शायना यांच्याऐवजी कोटक यांना संधी दिली. कोटक हे भाजपचे अमराठी नेते आहेत. मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी कोटक यांचे नाव पुढे केले आहे. काँग्रेसकडून भाई जगताप यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
मंत्री रामदास कदमांचा विजय निश्चित, जगताप-कोटक यांच्यात टक्कर
मुंबईतील दोन जागा जिंकण्यासाठी प्रत्येकी 75 मतांची गरज आले. मुंबई महापालिकेत एकूण 227 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ 75 पेक्षा अधिक असून रामदास कदम यांचा विजय निश्‍चित आहे, पण काँग्रेसचे भाई जगताप यांना मात्र विजयासाठी मनसे, समाजवादी पक्षाची मते घ्यावी लागणार आहेत. मनसे आपले मत भाजपच्या पदरात टाकणार की काँग्रेसच्या याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दुस-या जागेसाठी काँग्रेसच्या भाई जगताप यांच्याविरोधात भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे 32 नगरसेवक आहेत. त्यांना मनसेच्या 28 मतांची साथ हवी आहे. तरीही भाजपला 15 मते कमी पडतात. ती शिवसेनेच्या कोट्यातून मिळू शकतात. मात्र आशिष शेलार आणि शिवसेनेचे संबंध पाहता ते शक्य होईल का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर, काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत. त्यामुळे उर्वरित 23- 24 मतांसाठी त्यांना मनसे, राष्ट्रवादी व सपाकडे झोळी पसरावी लागणार आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना मनसे व सपाची गरज असून ते कोणाच्या गळाला लागणार यावर जगताप आणि कोटक यांचे भवितव्य ठरेल. जो उमेदवार पैसा फेकेल तोच उमेदवार विजयी होईल हे त्यामुळेच बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहा, म्हणजे परिस्थिती लक्षात येईल....
शिवसेना-75 + 13 (अपक्ष)= 88
भाजप- 31 + 1 (अपक्ष) = 32
काँग्रेस- 52
राष्ट्रवादी- 13
मनसे- 28
सपा- 09
शेकाप-01
अपक्ष-04
बातम्या आणखी आहेत...