मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना गुरुवारी पावसाचा एक थेंबही पडलेला नसताना रस्त्यांवर गुडघाभर पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. किनारपट्टीवर वादळीवार्याचा लवलेश नसताना मुंबईच्या पश्चिम समुद्र किनार्यावर दुपारी भरतीच्या वेळी मोठ्या लाटा उसळल्या. त्यामुळे दादर आणि वरळी भागातील रस्त्यावर पाणी साचले होते. परिणामी, काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. ओमान या आखाती देशाजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात भरतीच्या वेळी 5 ते 15 फूट उंचीच्या लाटा उसळल्याचे सांगण्यात आले. या लाटांमुळे वाहून आलेली समुद्रातील घाण नाल्यांमध्ये साचल्याने या भागात दुर्गंधी पसरली होती. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दादर समुद्र किनार्याला लागून असलेल्या शिवाजी पार्क भागात राहतात. दुपारी त्यांनी रस्त्याची पाहणी करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिका कर्मचार्यांना व संबंधित नगरसेवकांना सूचना दिल्या.