आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालय नूतनीकरणासाठी 81 कोटींचा निधी मंजूर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालयाच्या नूतनीकरणासाठी 81.64 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे एक लाख चौरस फुटांची वाढीव जागा उपलब्ध होणार आहे. या कामावर देखरेख करण्यासाठी मुख्य सचिव जे. के. बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे.
या नूतनीकरणात प्रामुख्याने अग्निरोधक साधनांचा वापरही करण्यात येणार असून राजा अडरी कंपनीला नूतनीकरणाचे काम देण्यात आले आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये वरचे तीन मजले जळून भस्मसात झाले होते. त्याच्या नूतनीकरणाबाबतची योजना गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आली होती. त्या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमध्ये पहिल्यांदा चार ते सहा या मजल्यांची दुरुस्ती करण्यात येईल. भिंती, जमीन आणि छप्पर यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. तसेच दोन कार्यालयांच्या मधील मोकळ्या जागेचा आणखी चांगल्या पद्धतीने वापर करून घेऊन एक लाख चौरस फुटांची जागा अधिकची मिळू शकेल. यामध्ये सर्व मंत्र्यांना एकाच प्रकारच्या केबिन, बैठकीसाठी खोली देण्यात येईल. तिथे एकाच प्रकारचे जिप्सम असलेले लाकडी फर्निचर किंवा पार्टिशनचा वापर करण्यात येईल. तसेच सर्व मजल्यांवर स्प्रिंकलर्स, फायर अलार्म लावण्यात येतील. तसेच कँटीनसाठी होणा-या गॅस सिलिंडरच्या वापराऐवजी पाइप गॅसचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिका-याने सांगितले. वरच्या तीन मजल्यांचे काम झाल्यानंतर तळमजल्यापासून तीन मजल्यांचेही मजबुतीकरण व काही अंतर्गत रचना बदलण्याचे काम करण्यात येईल.
मंत्रालयाच्या दोन इमारतींमधला भाग वापराविनाच आहे. तिथे एशियाटीक सोसायटीप्रमाणे पहिल्या मजल्यापर्यंत मोठ्या पाय-या केल्या जातील. तसेच मंत्रालयामध्ये कामासाठी येणा-या लोकांना या एकाच ठिकाणाहून प्रवेश मिळेल. तळ मजल्यावर मुख्य दाराजवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील मोकळ्या भागाचा त्यासाठी वापर करून घेता येईल. संपूर्ण मंत्रालयाच्या या नूतनीकरणासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.