आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाला नक्कीच मिळेल आरक्षण - विनोद तावडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई न्यायालयात सुरू अाहे. न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रभावीपणे बाजू मांडण्यात येईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल,’ असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत व्यक्त केला.
मराठा समाजाला ईएसबीसी या प्रवर्गामध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढूनही कार्यवाही होत नसल्याबद्दल विनायक मेटे (बीड), धनंजय मुंडे, सुनील तटकरे आदींनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. ‘मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण सिद्ध करण्याच्या दृष्टीने विभागाने पुरावे गोळा केले आहेत. अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. उच्च न्यायालयातील पुढील सुनावणीच्या वेळी हे पुरावे आणि माहिती न्यायालयात सादर करण्यात येईल. मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकेची सुनावणी लवकर होण्याच्या दृष्टीने न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे,’ असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) आरक्षणानुसार १५ नोव्हेंबर २०१४ पूर्वी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शैक्षणिक सवलती देण्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या समर्थनासाठी न्यायालयात ठोस पुरावे सादर करण्याच्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीमार्फत मराठा आरक्षण धोरणाबाबत वेळीवेळी आढावा घेऊन आवश्यक पुरावे संकलित करण्याची कार्यवाही सुरू आहे. शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्याकरिता ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रवी कदम व ॲड. विजय थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विधिज्ञांना आवश्यक ती माहिती पुरवण्यासाठी सल्लागार तथा समन्वयक म्हणून डी. आर. परिहार यांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लवकरच आदेश
ज्या विद्यार्थ्यांना ईएसबीसी आरक्षणाअंतर्गत फी सवलत देण्यात आली आहे, ती सवलत न्यायालयाची अंतिम सुनावणी होईपर्यंत अथवा या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू राहील. त्याबाबत महिन्याभरात शासननिर्णय जारी करण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही तावडे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...