आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maratha Muslim Reservation News In Divya Marathi

मुस्लिम शब्द वगळला,राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी अध्यादेश तातडीने पाठविला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन एक आठवडा उलटण्याच्या आत या निर्णयात महत्वाचा बदल करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली. आरक्षणाच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना ‘मुस्लिम’ शब्द वगळण्यात आला असून बुधवारी रात्रीपर्यंतच या निर्णयाचा अध्यादेश राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवला जाण्याची शक्यता आहे.

सहा दिवस उलटल्यानंतरही या मराठा आरक्षणाच्या निर्णयाची अधिसूचना का निघाली नाही, याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. ही अधिसूचना न्यायालयीन कसोटीवर टिकावी म्हणून योग्य ती शब्दरचना केली जात असल्याचे सामाजिक न्याय विभागाने सांगितले. बुधवारी रात्रीपर्यंतच ही अधिसूचना स्वाक्षरीसाठी राज्यपाल के. शंकरनारायण यांच्याकडे पाठवली जाईल, असेही या बैठकीत सांगण्यात आले. या अधिसूचनेवर राज्यपालांनी स्वाक्षरी करताच त्याचे अध्यादेशात रुपांतर होईल आणि राज्यात मराठा-मुस्लिम आरक्षण लागू होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शैक्षणिक प्रवेशात यावर्षी मराठा-मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ होणार नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र अध्यादेश निघेपर्यंत काहीच करता येणार नाही, अशी असर्मथता उच्च शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली.

ओबीसीतील मुस्लिम धर्मातील काही जातींचा समावेश पुन्हा विशेष मागास प्रवर्गात करण्यात आला असल्याची तक्रार राज्यमंत्री फौजिया खान यांनी केल्याचे वृत्त आहे. मात्र अल्पसंख्यंक कल्याण मंत्री नसीम खान यांनी असे काहीही झालेले नसल्याचे सांगितले.

विशेष मागास प्रवर्ग (2)
धर्माच्या आधारावर दिलेले आरक्षण टिकणार नाही, याची पश्चातबुद्धी झालेल्या राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना मुस्लिम शब्द वगळण्यात आला. विशेष मागास प्रवर्ग (मुस्लिम) या श्रेणीत असलेले नाव आता विशेष मागास प्रवर्ग (2) असे नाव ठेवण्यात आले आहे. 1995 मध्ये गोवारी कांडानंतर गोवारी जातींसह 40 जातींचा समावेश असलेला विशेष मागास प्रवर्ग तयार करण्यात आला होता. आता मुस्लिमांसाठी त्याच नावाने प्रवर्ग तयार करण्यात आला आहे.