मुंबई- भाजपा नेते व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी दांडी मारली. तावडेंच्या नेतृत्त्वाखाली आज मंत्रालयात मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेत्यांची नियोजित बैठक होती. मात्र, तावडे-मेटे वगळता या मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेल्या समितीतील इतर पक्षीय नेत्यांनी बैठकीस गैरहजर राहणेच पसंत केले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण-विखे पाटील हे बैठकीस अनुपस्थित होते. दरम्यान, तावडेंनी त्यांच्याशिवाय मंत्रालयात बैठक घेऊन सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात पूर्ण ताकदीने मांडणार असल्याचे सांगितले.
येत्या 1 जुलै रोजी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी कोर्टात कोणते कोणते मुद्दे उपस्थित करावेत व सुनावणीला सामोरे जाताना कशी तयारी असावी हा आजच्या बैठकीचा विषय होता. मात्र, भाजप सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सर्वांना खेळवत असल्याची भावना वाढीस लागली आहे. याचमुळे अजित पवार, शिंदे व विखे-पाटील यांनी दांडी मारल्याचे समोर येत आहे.