आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मराठा आरक्षणाबाबत सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जरी काहीही निर्णय होऊ शकला नसला तरी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंगळवारी होणा-या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय आयत्या वेळचा मुद्दा म्हणून चर्चेला येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे अद्ययावत रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. तसेच राज्यातील होमियोपॅथी डॉक्टर्सना अॅलोपथीची परवानगी देण्याच्या निर्णयाचा अध्यादेश जारी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
ग्रामीण भागातल्या जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे रूपांतर 568 खाटांच्या अद्ययावत रुग्णालयात करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
समृद्ध गाव योजना सुरूच
तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना पुढे सुरू ठेवत पात्र ग्रामपंचायतींना प्रत्येक वर्षासाठी अंदाजे एकूण 300 कोटी रुपये देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी खुल्या बाजारातून साखर खरेदीची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत साखर महासंघाकडून साखर खरेदी करण्यासही आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. फेब्रुवारी ते जून 2014 या पाच महिन्यांसाठी ही साखर खरेदी करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातील 37 पदे भरण्यास व 38 पदांचे काम बाह्यस्रोतातून करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासाठी सुमारे 57 कोटी 58 लाख रुपये इतका खर्च येणार आहे.
आरक्षणाबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा
नारायण राणे समितीने मराठा समाजला 20 टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे. मात्र हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकू शकेल याचा अंदाज घेण्यासाठी राणे समितीच्या काही सदस्यांना कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला पाठवले आहे. मंगळवारी या टीमकडून सकारात्मक संकेत आल्यास संध्याकाळपर्यंत राज्य सरकारतर्फे मराठा आरक्षणाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उद्या संध्याकाळी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.