आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘भारतीय’ सज्ज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तगडी स्टार कास्ट, अजय-अतुलचं संगीत, श्रेया घोषालचा आवाज असलेले जांगडगुत्ता हे गीत, अभिजित घोलप यांची निर्मिती आणि गिरीश मोहिते यांचे दिग्दर्शन असे समीकरण असलेला ‘भारतीय’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर एक गाव आहे. मात्र, या गावापर्यंत अद्याप विकास नावाचा शब्दही पोहोचला नाही, अशी या चित्रपटाची कथा आहे.
घोलप यांच्या याआधीच्या ‘देऊळ’ या चित्रपटाने अटकेपार झेंडे लावले होते. यामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या गिरीश कुलकर्णी यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. या चित्रपटानंतर घोलप यांनी ‘भारतीय’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट सर्वच बाजूंनी सरस झाला आहे. यामध्ये कुलदीप पवार, डॉ. मोहन आगाशे, हृषिकेश जोशी, सुबोध भावे, मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, मिता सावरकर आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तेजश्री यांच्या भूमिका आहे. तसेच ‘भारतीय’ या चित्रपटाची जमेची बाजू झाली आहे ती, अजय-अतुल यांचे संगीत. श्रेया घोषालच्या आवाजात असलेले ‘आय यो ओ जांगडगुत्ता’ हे गीत प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय झाले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या एका गावाच्या आवतीभोवती या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. एकीकडे देशात अनेक क्षेत्रांत क्रांती झाली असताना हे गाव मात्र यापासून अनभिज्ञ असते. या गावात सर्वांसाठी एकच दूरध्वनी आहे. या गावाची माहिती एका तरुणाला होते, त्यानंतर तो गावाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो. मग यातून होणा-या भन्नाट गमतीजमती चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती ही अभिजित घोलप यांनी केली आहे, तर दिग्दर्शन हे गिरीश मोहिते यांनी केले आहे. नुकताच चित्रपटाचा भव्य कार्यक्रम पुण्यात सर्व कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.
अक्षयच्या ‘जोकर’ची कथा सारखीच - शिरीष कुंदेरची निर्मिती असलेला ‘जोकर’ हा चित्रपटदेखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यामध्ये विशेष म्हणजे ‘भारतीय’ आणि ‘जोकर’ या चित्रपटाची कथा ही जवळपास मिळतीजुळती आहे. कथा जरी सारखी असली तरी मराठी चित्रपटाचा बाज काही औरच असतो. त्यामुळे दोन्ही चित्रपट आपल्या परीने यश मिळवतील, असे वितरकांना वाटते.