आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाप्रमुखांचा आवाज घुमणार चित्रपटगृहांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो आणि मातांनो...’ हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज २३ जानेवारीपासून राज्यातील चित्रपटगृहांमध्ये घुमणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आणि विचारावर आधारित "बाळकडू' चित्रपट तयार झाला असून या चित्रपटाची संगीत ध्वनिफीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतीच मुंबईत सादर करण्यात आली.

उद्धव ठाकरे यांनी ‘दिव्य मराठीशी बोलताना सांगितले, शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली; परंतु हे सगळ्यांनाच शक्य होईल याची खात्री नव्हती. मात्र, संजय राऊत यांनी जेव्हा ‘बाळकडू’बाबत सांगितले तेव्हा आम्ही लगेच या चित्रपटाला परवानगी दिली. याचे कारण एवढेच की, संजय राऊत यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिले आहे आणि त्यांचे विचार खऱ्या अर्थाने दाखवले जातील, असा विश्वास मला वाटल्यानेच चित्रपटाला परवानगी दिली. चित्रपटाने मराठी माणसाच्या मनात पुन्हा स्फुल्लिंग फुलेल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेना नेते संजय राऊत या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. राऊत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्याबरोबर मला अत्यंत जवळून काम करता आले, त्यांच्या सावलीत मला राहता आले. शिवसेना होती म्हणून मराठी माणूस राज्यात टिकून राहिला. आताच्या पिढीला शिवसेनाप्रमुखांची हीच ओळख या चित्रपटाद्वारे करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या चित्रपटात पडद्यावर बाळासाहेबांचा आवाजही घुमणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या आवाजाचा वापर करून, त्याचा पडद्यावरील संवादासाठी अतिशय खुबीने वापर केलेला आहे.

चित्रपटातील नायकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बाळासाहेबांचा आवाज ऐकू येतो आणि त्याला एक नवी दिशा मिळते, असे चित्रपटाचे कथानक असून चित्रपटात बाळासाहेबांचे दर्शनही घडवले जाणार आहे.

अतुल काळेंचे दिग्दर्शन
रॉयल मराठा एंटरटेनमेंट निर्मित चित्रपटाची निर्मिती स्वप्ना पाटकर यांनी केली असून दिग्दर्शन अतुल काळे यांचे आहे. अजित-समीर यांनी संगीत दिले असून उमेश कामत, नेहा पेंडसे, सुप्रिया पाठारे, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, जयवंत वाडकर, हृदयनाथ राणे आणि रमेश वाणी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा-संवाद अंबर हडप, गणेश पंडित यांनी लिहिली आहे.