आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडेंची ‘संघर्ष यात्रा’ रुपेरी पडद्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्यांचे अख्खे आयुष्यच संघर्ष यात्रा बनून गेले होते ते दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट लवकरच येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे नाव ‘संघर्ष यात्रा’ असून मुंडेंच्या प्रमुख भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी किंवा सुबोध भावे यांची नावे पुढे आली आहेत. या दोन्ही अभिनेत्यांशी चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन युतीचे सरकार येणार, असा दुर्दम्य आशावाद जनमानसात रुजववण्याचे मोठे काम मुंडेंनी केले होते. लोकसभेत भाजप शिवसेनेला मोठे यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही स्वप्न साकार होणार याचा मुंडेंना आत्मविश्वास होता. मात्र, दुर्दैवाने केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच अल्पावधीतच मुंडेंचे अपघाती निधन झाले आणि राज्याला विशेषत: मराठवाड्याला मोठा धक्का बसला. बीडमधील जनता अजूनही या दु:खातून सावरलेली नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने मुंडेंची संघर्ष यात्रा रुपेरी पडद्यावर पाहून त्यांच्यावर अपार प्रेम करणार्‍यांचे दु:ख थोडसे हलके करण्याचा हा छोटा प्रयत्न असेल, असे हा चित्रपट बनवणार्‍या राहुल रॉय प्रॉडक्शन हाऊसकडून सांगण्यात आले. मुंडेंच्या या चित्रपटासाठी रॉय प्रॉडक्शनला भाजपची चित्रपट युनियन मदत करत आहे.

संदर्भापासून ते भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांना भेटून मुंडेंचे चरित्र ठळकपणे डोळ्यासमोर येण्यासाठी युनियन प्रॉडक्शनला मदत करणार आहे.

कार्यकर्ता ते लोकनेता
मुंडेंचे बालपण, केंद्र सरकारमध्ये ग्रामीण विकासमंत्री ते त्यांच्या दुर्दैवी निधनापर्यंतचा प्रवास चित्रपटात मांडण्यात येणार आहे. गरिबीतील बालपण, महाजन कुटुंबाने त्यांना दिलेला आधार, प्रमोद महाजनांशी त्यांची मैत्री, लोकनेता म्हणून त्यांनी कमावलेले नाव, १९९५ मध्ये युतीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, सर्वसामान्यांना मुंडेंचा असलेला आधार, ग्रामीण भागातील जनतेची अचूक नाडी ओळखणारा नेता, त्यांच्या राजकीय जीवनातील चढ-उतार, लोकांशी संवाद साधणारा त्यांचा आवाज, भाषणे, सत्ताधार्‍यांवर अंकुश, निर्णय क्षमता अशा बाबींवर या चित्रपटात फोकस करण्यात येणार आहे.

‘प्रमोद महाजनां’चा शोध
चित्रपटाचे नाव निश्चित झाले असून आता कलाकारांची निवड सुरू आहे. मुख्य भूमिकेसाठी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या नावाचा प्राधान्याने विचार केला जात असला, तरी त्यांनी अद्याप होकार दिलेला नाही. यामुळे सुबोध भावे यांचेही नाव पुढे करण्यात आले आहे."बालगंधर्व' तसेच "लोकमान्य टिळक'मधून चरित्र भूमिका प्रभावीपणाने रंगवणार्‍या सुबोधचाही विचार होऊ शकतो. विशेष बाब म्हणजे प्रमोद महाजन यांच्या भूमिकेसाठीही कसदार कलाकारांचा शोध घेण्यात येत आहे. मुंडेंप्रमाणेच ही भूमिका सशक्त होण्यासाठी पटकथा, संवादात विशेष मेहनत घेण्यात येत आहे.