आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Films Good Days Like Sallow Mankarand Anaspure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी चित्रपटांचे चांगले दिवस ही ‘सूज’! अभिनेते मकरंद अनासपुरे याचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी चित्रपट कोट्यवधींची उड्डाणे घेत आहे. मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आल्याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, हे चांगले दिवस नसून आलेली सूज आहे. मराठी चित्रपटांना ख-या अर्थाने चांगले दिवस आणायचे असतील तर राज्यात सुमारे २०० चित्रपटगृहे फक्त मराठी चित्रपटांसाठी तयार करण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच मराठी चित्रपट ख-या अर्थाने कोट्यवधींची उड्डाणे घेतील, असे मत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

ड्रीम क्रिअेचर मोशन पिक्चर्स आणि आयव्हीएम एंटरटेन्मेंटद्वारा निर्मित आणि राजू पार्सेकर दिग्दर्शित "वाँटेड बायको नंबर वन' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मकरंद अनासपुरे आणि स्मिता गोंदकर यांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या मुंबई कार्यालयाला भेट दिली. या वेळी तो बोलत होता.

मकरंद म्हणाला, ‘मराठीत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत असले तरी प्रेक्षकांची खरी भूक ही मनोरंजन, मनोरंजन आणि फक्त मनोरंजन करणारे चित्रपट असतात. दोन घटका त्यांची करमणूक व्हावी या उद्देशानेच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. चित्रपटाच्या नावातच याची कथा दिसून येते. चित्रपटात मी नायकाची भूमिका साकारत असून मला लग्न करायचे असते, परंतु माझे स्वर्गीय पिताश्री कुख्यात गुंड असतात. ते या जगात नसले तरी त्यांची दहशत कायम असते. त्यामुळे मला मुलगी द्यायला कोणी तयार नसते. अशा वेळेस माझा मित्र कपिल (सयाजी शिंदे) माझ्या मदतीला धावतो आणि माझ्यासाठी मुलगी शोधण्याचा प्रयत्न करतो. मला चांगली बायको मिळावी हा त्याचा उद्देश असतो, यासाठी तो जे काही प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नात तो कसा फसतो याचे उत्कृष्ट चित्रण या चित्रपटात केले आहे. सयाजी आणि माझी जोडी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा या राजकीय विनोदी चित्रपटातून प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता एका कौटुंबिक विनोदी चित्रपटात आम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एकत्र येत आहोत.’

मकरंदसाेबत पहिलाच चित्रपट
मी प्रथमच सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे या प्रख्यात जोडीबरोबर काम करत आहे. चित्रपटात मी सयाजी शिंदेच्या मैत्रिणीची भूमिका करत आहे. सयाजी मकरंदसाठी मुलगी शोधत असतात, या कामी मी त्यांना मदत करते, परंतु ती कशी आमच्या अंगलट येते हे राजू पार्सेकर यांनी चांगल्या पद्धतीने दाखवले आहे. यात मी एका ग्लॅमरस मुलीची भूमिका करत आहे.
स्मिता गाेंदकर, अभिनेत्री