आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्‍बल 55 वर्षांनंतर माय मराठी झाली राजभाषा; विधानसभेत विधेयक संमत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई – संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या निर्मितीनंतर माय मराठीला महाराष्‍ट्राची भाषा म्‍हणून आज (बुधवार) मान्‍यता मिळाली आहे. या बाबत विधानसभेत महाराष्ट्र राजभाषा सुधारणा विधेयक विधानसभेत संमत झाले. त्‍या अनुषंगाने मराठी आता ख-या अर्थाने राजभाषा झाली आहे.
अधिनियमामध्ये नव्‍हती महाराष्‍ट्राची भाषा मराठी ?
मराठी ही राज्याची राजभाषा आहे, असा स्पष्ट उल्लेख महाराष्ट्र राजभाषा अधिनियमामध्ये कुठेही नव्हता. पण, परंतु देवनागरी लिपीतील मराठी भाषा, असा उल्लेख अधिनियमात होता. त्यामुळे त्यात मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे, असा उल्लेख महाराष्ट्र राजभाषा अधिनियमात करण्यात आला आहे. आज महाराष्ट्र राजभाषा सुधारणा विधेयक विधानसभेत संमत झाले. त्यामुळे मराठीला खऱ्या अर्थाने राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला.
आता प्रतीक्षा अभिजात दर्जाची
इसवी सन पूर्व काळापासून मराठी बोलली जाते. आज जगातील तब्‍बल 11 कोटी व्‍यक्‍ती मराठी बोलतात. ही जागातील दहा क्रमांकाची भाषा असून, दोन हजार वर्षांपासून या भाषेतून साहित्‍य निर्मिती होत आहे. त्‍यामुळे या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी काही वर्षांपासून जोरकसपणे केली जाते. त्‍याला यशही आले आहे. पण, अजूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाण्‍याची प्रतीक्षाच आहे.
काय आहेत अभिजात भाषेचे निकष
मराठी भाषेला केंद्र सरकारने 'अभिजात' भाषेचा दर्जा मात्र दिलेला नाही. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि संस्कृत या चार भाषांना तो मिळालेला आहे. भाषेच्या अभिजातपणासंबंधी केंद्र सरकारचे चार निकष आहेत. १) भाषा दीड ते दोन हजार वर्षे जुनी असावी. २) ती भाषा बोलणाऱ्या लोकांनी मौल्यवान वारसा म्हणून जपलेले प्राचीन साहित्य असावे. ३) भाषेची परंपरा तिची स्वत:ची असावी. ४)भाषेचे आधुनिक रूप हे तिच्या प्राचीन रूपांहून भिन्न असले, तरी चालेल; पण त्यांच्यात आंतरिक नाते असावे. हे चारही निकष मराठी भाषा पूर्ण करते. प्राचीन महाराष्ट्री भाषा- अपभ्रंश भाषा- मराठी असा मराठीचा प्रवास आहे. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू यांसारखे श्रेष्ठ ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले, ती त्याच्याआधी किमान हजार-बाराशे वर्षे समृद्ध भाषा होती.