Home | Maharashtra | Mumbai | Marathi language and government-backed National Digital Library of India project

मराठीसह इतर भाषिक पुस्तके मोफत वाचण्याची संधी; आयआयटी खरगपूरचे खास अॅप

समीर परांजपे | Update - May 18, 2017, 03:00 AM IST

प्रायमरी ते पीजी या शैक्षणिक स्तरातील विद्यार्थी, वाचक यांच्यासाठी आता भारतीय भाषांसह विविध भाषांतील सुमारे ६७ लाख पुस्तके, नियतकालिके, थिसिस व लेख पुस्तके मोफत स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.

  • Marathi language and government-backed National Digital Library of India project
    मुंबई: प्रायमरी ते पीजी या शैक्षणिक स्तरातील विद्यार्थी, वाचक यांच्यासाठी आता भारतीय भाषांसह विविध भाषांतील सुमारे ६७ लाख पुस्तके, नियतकालिके, थिसिस व लेख पुस्तके मोफत स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. पश्चिम बंगालमधील आयआयटी खरगपूरने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रकल्प असलेल्या नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (एनडीएलआय) या महाप्रकल्पासाठी नुकताच खास अॅप विकसित केला आहे. हा अॅप स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर वाचकांना अन्य भाषांतील पुस्तकांबरोबरच ५ हजारांहून अधिक मराठी पुस्तके डिजिटल रूपात वाचनासाठी उपलब्ध झाली आहेत.

    एनडीएलआयच्या वेबसाइटवर मराठी बुक्स असे सर्च ऑप्शन दिल्यानंतर सध्या ५ हजारांहून अधिक मराठी पुस्तके वाचकांना पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होतात. मराठी पुस्तकांची संख्या येत्या वर्षभरात दोन लाखांपर्यंत जाईल. त्यात विषयांच्या विविधतेनुसार आपल्याला डिजिटल स्वरूपात ती पुस्तके वाचता येतात. इतिहास व भूगोल विषयाच्या पुस्तकांवर क्लिक केले असता शंकर वामन दांडेकरांनी संपादित केलेली ज्ञानेश्वरी, वि. ल. भावे यांनी लिहिलेल्या मराठी दप्तर या पुस्तकाचे काही खंड इथपासून विज्ञानावरील अनेक विषयांची मराठी पुस्तके इथे उपलब्ध आहेत.

    देशातील १०० संस्थांचा समावेश
    नॅशनल डिजिटल लायब्ररी आॅफ इंडिया या प्रकल्पामध्ये देशातील सुमारे १०० विविध संस्थांचा समावेश आहे. त्यामध्ये देशातील विविध राज्यांतील अग्रगण्य शासकीय ग्रंथालये तसेच शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. अँड्रॉइडची सुविधा असलेल्या मोबाइलधारकांना हा अॅप डाऊनलोड करून घेता येईल. एनडीएलआयचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी वाचकाने https://ndl.iitkgp.ac.in वा या साइटवर जाऊन स्वत:ची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी झाल्यानंतर वाचकाला त्याच्या आवडीचे पुस्तक विषय, लेखकाचे नाव, भाषा या क्रमानुसार शोधता येईल. ते केवळ मोफत वाचता येईलच, असे नव्हे, तर ते पुस्तक डाऊनलोडही करून घेण्याची सुविधाही देण्यात अाली अाहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी साइटवर ऑडिओ बुक्स करण्याकडेही वाटचाल सुरू आहे. हे अॅप सध्या इंग्लिश, हिंदी व बंगाली भाषेत असून ते काही महिन्यांतच मराठी भाषेतही कार्यान्वित होणार आहे.

Trending