आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सर्व कार्यालयांसह रेल्वे, बँकांमध्ये मराठी अनिवार्य; शासन निर्णय जारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील सर्व केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या आणि रेल्वेसह सेवा पुरवणाऱ्या कार्यालयांमध्ये यापुढे त्रिभाषा सूत्रानुसार इंग्रजी आणि हिंदीबरोबरच मराठीचा वापर करणे अनिवार्य असल्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. 


संसदेच्या दोन्ही सभागृहांत इंग्रजी, हिंदीसह प्रादेशिक भाषेचा वापर करण्याबाबतचा ठराव मंजूर झालेला आहे. केंद्राने सर्व राज्यांना याबाबतचे निर्देशही दिले आहेत. परंतु राज्य सरकारची कार्यालये वगळता अन्य कार्यालयांत मराठीचा वापर होत नसल्याचे लक्षात आल्यानेच सरकारने तातडीने आदेश जारी केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दुकानांवर मराठीतून फलक लावावेत, यासाठी आंदोलन केले होते. २००९ च्या कायद्यानुसार दुकानांनी मराठीत फलक लावणे बंधनकारक आहे. अन्यथा १ ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. परंतु या नियमाचे पालन होत नव्हते.   


कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण, कार्यशाळेचे आयोजन  
राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या राजभाषा विभागाने त्रिभाषा सूत्राचा वापर करण्याचे १८ जून १९७७ आणि १ जुलै २०१० रोजी सर्व राज्यांना निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्रात कार्यरत केंद्र शासनाची कार्यालये व आस्थापना, बँका, रेल्वे, मेट्रो, विमान कंपन्यांच्या निदर्शनासही हा नियम आणून देण्यात आला आहे. या कार्यालयांमध्ये हिंदी, इंग्रजीसोबतच देवनागरी लिपीचा वापर करण्याचे आदेशात म्हटले आहे. यासाठी संबंधित कार्यालयांनी अधिकारी कर्मचारी यांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये प्रादेशिक भाषेची अट अनिवार्य करावी आणि यासाठी मराठी भाषा कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे, असेही शासनाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

 

कुठे कुठे नियम लागू  
- जनतेशी होणारे सर्व पत्रव्यवहार   
- जनतेच्या माहितीसाठी प्रदर्शित करावयाच्या सूचना  
- जाहीर सूचना, सूचना फलक, निर्देश फलक  
- जाहिराती व नावाच्या पाट्या   
- कार्यालयांमार्फत पुरवली जाणारी सर्व प्रपत्रे, नमुने, आवेदन पत्रे  
- आरक्षण नमुने, प्रवासी तिकीट, सर्व बँक व टपाल पावत्या  
- ऑनलाइन आणि ऑफलाइन सेवेतील दस्तऐवज   
- विमानतळ, सूचना, विमानांचे आगमन व निर्गमन  
- रेल्वेची नामफलक, रेल्वे डबा क्रमांक, स्थानक  
- सार्वजनिक घोषणा इत्यादी.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...