आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट महामंडळ निवडणुकीत \'समर्थ\'ची बाजी; विजय पाटकर, विजय कोंडकेंना धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्षा उसगावकर यांनी अभिनेत्री गटातून अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचा 55 मतांनी पराभव केला. - Divya Marathi
वर्षा उसगावकर यांनी अभिनेत्री गटातून अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचा 55 मतांनी पराभव केला.
कोल्हापूर- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत मेघराज भोसले आण् सतीश रणदिवे यांच्या समर्थ पॅनेलने बाजी मारली. समर्थ पॅनेलने 14 पैकी 12 जिंकत सत्ताधारी विजय पाटकर यांच्या क्रियाशील पॅनेलला जोरदार धक्का दिला. पाटकर यांच्या क्रियाशील पॅनेलमधील शशी बिडकर हे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत. विजय कोंडके आणि प्रसाद सुर्वे या माजी अध्यक्षांना पराभावाला सामोरे जावे लागले. त्यामुळे माजी अध्यक्ष विजय पाटकर, प्रसाद सुर्वे, विजय कोंडके यांच्या पॅनेलच्या उमेदवारांना मतदारांनी पूर्णपणे नाकारल्याचे या निकालावरून दिसून येत आहे. 
 
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी 54 टक्के मतदान झाले होते. एकूण 3,900 पैकी 2,135 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत नऊ पॅनेलचे 120 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मंगळवारी कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉल येथे मतमोजणी सुरु आली. मात्र, मतमोजणीस अत्यंत संथगतीने सुरुवात झाली. बारा तास झाले, तरी एकही निकाल लागला नव्हता. अखेर रात्री उशिरा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली.
 
वर्षा उसगावकरांकडून निवेदिता सराफांचा पराभव-
 
अभिनेत्री गटातून समर्थ पॅनेलच्या वर्षा उसगावकर व क्रियाशील पॅनेलच्या निवेदिता सराफ यांच्यात लढत झाली. मात्र, वर्षा उसगावकर यांनी बाजी मारली. उसगावकर यांना 566 तर सराफ यांना 511 मते मिळाली. दीपाली सय्यद यांना 256 मते मिळाली. अभिनेता विभागातून सुशांत शेलार याने विजय पाटकर यांचा पराभव केला. निर्मिती व्यवस्था विभागातून समर्थ पॅनेलचे संजय ठुबे (520) यांनी विद्यमान उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांचा पराभव केला.
 
निर्माता विभागातून मेघराज भोसले (614), दिग्दर्शक विभागातून सतीश रणदिवे, संगीत विभागातून निकिता मोघे, लेखक विभागातून पितांबर काळे (718), स्थिर चलत विभागातून धनाजी यमकर, प्रदर्शन विभागातून मधुकर देशपांडे, संकलन विभागातून विजय खोचीकर, ध्वनिरेखक गटातून शरद कृष्णात चव्हाण (621), रंगभूषा गटातून चैताली डोंगरे (593), कामगार विभागात रणजित (बाळा) जाधव यांनी विजय खेचून आणला. हे सर्व समर्थ पॅनेलचे उमेदवार आहेत.