आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Movies For Prime Time Shows, Orders Maharashtra Government

मराठीच्या वाट्यालाही पेप्सी, पॉपकॉर्न अन् प्राइम टाइम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पेप्सी, पॉपकॉर्न पार्किंग अशा तीन ‘पी’शी मराठी माणसाचे समीकरण जुळत नसल्याचे तथाकथित अनुमान काढून प्राइम टाइमची दारे मराठी चित्रपटांसाठी कायमची बंद करणार्‍या मल्टिप्लेक्स चालकांना मुख्यमंत्री फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी चांगलाच दणका दिला आहे. या संदर्भात आदेश काढून फडणवीस यांनी मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइम (संध्याकाळी ते ९) या वेळेत एक मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे मराठी चित्रपट मल्टिप्लेक्स यांच्यात मारामारी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील मल्टिप्लेक्स मालकांनी प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवणे आणि चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणे सरकारने मंगळवारी बंधनकारक केले. भारतीय चित्रपटसृष्टीचे भीष्मपितामह दादासाहेब फाळके यांच्या सन्मानार्थ लघुचित्रपट दाखवण्याचे आदेशही देण्यात आले. मराठी भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे तावडे यांनी विधानसभेत सांगितले.

नियमाची गरज काय?
मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता प्राइम टाइमला दाखवावाच लागेल अशा स्थितीपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. मात्र, ते दर्जा आणि लोकप्रियतेच्या बळावर व्हायला हवे. तरीदेखील, प्राइम टाइमबाबत घेण्यात आलेल्या सरकारच्या या निर्णयाचे मी स्वागतच करते. सई ताम्हणकर, अभिनेत्री

कायदा काय म्हणतो ?
बॉम्बेसिनेमा रेग्युलेशन अ‍ॅक्ट १९५३च्या अंतर्गत सेक्शन (३) नुसार थिएटरचे परवाने देताना सरकारला मालकांवर काही अटी घालण्याचा अधिकार आहे. त्यानुसार, राज्य सरकारने मार्च १९६८ पासून थिएटर मालकांना वर्षांतून २८ दिवस मराठी चित्रपट दाखविणे बंधनकारक केले. यात शो नेमके किती, याबाबत जवळपास ४० वर्षे संभ्रम होता. त्यामुळे थिएटर मालक २८ मराठी चित्रपट वर्षांला दाखवत असत. काही वर्षांपूर्वी सरकारने १९६८च्या आदेशात बदल करून नवा आदेश काढला. यात ११२ शो दाखवावेत, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ‘सिनेमा ओनर्स असोसिएशन’ या थिएटर मालकांच्या संघटनेने या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली. ११२ शोंची अट काढावी अशी मागणी ‘सिनेमा ओनर्स असोसिएशन’ने केली. १५ जून २०१० रोजी न्यायालयाने सरकारच्या आदेशाला स्थगिती देत चित्रपटगृहांत वर्षांतून ११२ ऐवजी ४४ शो दाखवावेत, असा निकाल दिला.

प्राइम टाइमच बंधनकारक ठेवू नये
मराठीसाठी एकच शो ठेवू नये. छोटी गावे रात्री लाच बंद होतात. अशावेळी ते शो ठेऊन उपयोग नाही. दिवसातून ठराविक शो बंधनकारक करावे. आदित्य सरपोतदार, दिग्दर्शक

मराठी चित्रपटाची प्राइम टाइम ही गरज
मराठी सिनेमा सध्या उभारी घेत आहे. त्यामुळे चित्रपटगृहांत चांगले शोज मिळणे गरज आहे. केवळ सकाळ वा दुपारचा एखादा शो देण्याइतपत परिस्थिती उरलेली नाही. विजय पाटकर, अध्यक्ष, अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ

प्राइम टाइम हा मराठी चित्रपटाचा अधिकारच
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे मनसेतर्फे स्वागत आहे. प्राइम टाइम मिळत नसल्याची तक्रार सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच केला. प्रसंगी आंदोलनही केले. या निर्णयाद्वारे मराठीसाठी चांगली संधी खुली केली आहे. खरेतर मराठी चित्रपटाचा हा अधिकारच आहे.पण, केवळ प्राइम टाइम देऊन चालणार नाही तर मराठी चित्रपटांच्या इतरही बाबतीत तावडेंनी लक्ष घालायला हवे. अमेय खोपकर, मनसे चित्रपट सेना

निर्णयाचे स्वागतच
मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटाला प्राइम टाइम मिळणे ही उत्तम संधी आहे. आमच्या चित्रपटांना प्राइम टाइम देण्याबाबतीत कधीच अडचण आली नाही मात्र अनेकांना प्राइम टाइम मिळाल्याने तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. निखिल साने, चित्रपटनिर्माते