आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी नाट्य परिषदेसाठी रंगणार निवडणुकीचा जंगी सामना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या फेब्रुवारी महिन्यात होणा-या पंचवार्षिक निवडणुकीत मराठी रंगभूमीवरील कलावंत, निर्माते, बॅकस्टेज आर्टिस्ट यांची सरमिसळ असलेल्या परस्परविरोधी पॅनल्समधील जंगी सामना रंगणार आहे. विनय आपटे, स्मिता तळवलकर आदींचा समावेश असलेल्या पॅनलच्या विरोधात नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली ‘उत्स्फूर्त’ पॅनल शड्डू ठोकून उतरले आहे.
जोशी यांच्या पॅनलमध्ये नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर, राहुल भंडारे, प्रसाद कांबळी, अभिनेता डॉ. गिरीश ओक, विजय कदम, गिरीश जोशी, दीपक करंजीकर, सुशांत शेलार, शिवाजी शिंदे, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, नीना कुलकर्णी, स्मिता जयकर, शीतल शुक्ल, अ‍ॅड. देवेंद्र यादव, गीता सोमण, कामगार नेते दिवाकर दळवी, कृष्णा जाधव, नेपथ्यकार सुनील देवळेकर आदींचा समावेश आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने विदेशात नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते, पण त्या वेळी भोंगळ कारभारामुळे अनेक पत्रकारांना या संमेलनाला जाता न आल्याने गदारोळ माजला होता. त्याची परिणती मोहन जोशी यांनी नाट्य परिषदेचा राजीनामा देण्यात झाली होती. त्यानंतर नाट्य परिषदेचे हंगामी अध्यक्ष म्हणून हेमंत टकले यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीने केलेल्या सुमारे दोन वर्षांच्या कारभारानंतर आता ही पंचवार्षिक निवडणूक होत आहे. तिचा निकाल 20 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.
कांबळीपुत्र जोशी पॅनलमध्ये
मोहन जोशी हे नाट्य परिषदेचे पहिल्यांदा अध्यक्ष झाले, त्या वेळी त्यांनी मच्छिंद्र कांबळी यांना पराभूूत केले होते. मात्र, बदलत्या काळाप्रमाणे संदर्भही बदलतात. यंदाच्या निवडणुकीत मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील उत्स्फूर्त पॅनलमध्ये मच्छिंद्र कांबळी यांचा मुलगा प्रसाद हाही सहभागी झाला आहे. हा मोहन जोशींचा मोठा विजय आहे, असे उद्गार प्रख्यात नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी या पत्रकार परिषदेत काढले.