आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी; आपटे आपटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बनावट मतपत्रिकांवरून वादाच्या वादळात भरकटलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जहाजाचे सुकाणू सावरण्यासाठी अखेर कॅप्टन मिळाला. परिषदेच्या अध्यक्षपदी रविवारी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची बहुमताने निवड झाली. जोशी यांना 28, तर त्यांचे विरोधक, ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांना 15 मते पडली.
माटुंग्यातील यशवंत नाट्यगृहात पार पडलेल्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत जोशी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. नाट्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी प्रमोद भुसारी, प्रमुख कार्यवाह म्हणून दीपक करंजीकर, कोशाध्यक्षपदी लता नार्वेकर, सहकार्यवाहपदी भाऊसाहेब भोईर व सुनील वणजू यांची निवड करण्यात आली. प्रसाद कांबळी, प्रफुल्ल महाजन, सतीश लोटके, श्रीपाद जोशी, सुनील ढगे, दिलीप बेवरणकर, किशोर आयनवार व वि. ना. लोकूर यांची कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवड झाली.
जोशी यांचे उत्स्फूर्त पॅनल व आपटे यांचे नटराज पॅनल या दोघांनाही मुंबईत समान म्हणजे प्रत्येकी 8 मते पडली होती, परंतु उर्वरित महाराष्ट्रात जोशी यांच्या पॅनेलला अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या पॅनलचा परिषदेवर वरचष्मा राहणार, हे निश्चित होते; परंतु मतदारांच्या संख्येपेक्षा मतपत्रिकांचीच संख्याच जास्त भरल्याने या प्रकाराची शहानिशा करण्याची मागणी दोन्हीही गटांनी केली होती. तसेच मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवरून मोठा गदारोळ उठला होता. या पेचावर मार्ग काढण्यासाठी मुंबई विभागाच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देत हे प्रकरण सहधर्मादाय आयुक्तांकडे नेण्यात आले. या बोगस मतपत्रिका प्रकरणाची पोलिस चौकशी अद्याप सुरू आहे.

सर्वच भागांना प्रतिनिधित्व
यापूर्वी नाट्य परिषदेच्या कारभारावर केवळ मुंबईचीच मक्तेदारी होती, परंतु नव्या कार्यकारिणीत राज्यातील सर्वच भागांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्याचा नाट्य परिषदेच्या कारभारावर चांगला परिणाम होणार असून राज्याच्या तळागाळात नाट्य चळवळ पोहोचेल. मराठी नाट्य चळवळीला भरभराटीचे दिवस येतील.
प्रफुल्ल महाजन, कार्यकारिणी सदस्य