आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राठोड, चंदनशिवे, अाेलवेंना दया पवार स्मृती पुरस्कार, २० सप्टेंबर राेजी हाेणार वितरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा दया पवार स्मृती पुरस्कार कवी-लेखक वीरा राठोड, लोककला अभ्यासक शाहीर प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि छायाचित्रकार सुधारक ओलवे यांना जाहीर झाला आहे. प्रत्येकी पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २० सप्टेंबर रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई येथे सायंकाळी ७.१५ वाजता पुरस्कार वितरण हाेईल.

ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान केला जाईल. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक जयंत पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद येथे प्राध्यापक असलेले वीरा राठोड यांच्या भटक्या, बंजारा संस्कृतीवर आधारित असलेल्या ‘सेन सायी वेस’ या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीने नुकतेच गौरवले होते.
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘दीवानी मस्तानी’ हे गाणे गाणारे मराठवाड्याचे प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख म्हणून कार्यरत असून तमाशावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. लोककलांचे सादरीकरण आणि संशोधन अशा दोन्ही भूमिका पार पाडणाऱ्या चंदनशिवे यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या खास रांगड्या गायनशैलीचा प्रभाव पाडला अाहे. समाजातल्या शोषित-वंचितांचे जगणे कॅमेऱ्यात बंदिस्त करून जगासमोर मांडणारे ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुंबईतील विविध दैनिकांत सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केले अाहे. सफाई कामगारांच्या भीषण वास्तवावर आधारित ‘न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात’ हे त्यांचे फोटोबुक खूप गाजले. झारखंडमधील माता-बालमृत्यू, कामाठीपुरा येथील शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांचे जीवन, मेघालयातील आदिवासींची स्थिती अशा विविध विषयांमधून त्यांनी सामाजिक जाणीव प्रकट केली आहे.
बातम्या आणखी आहेत...