आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एमआयएम\' सह 191 पक्षांची नोंदणी रद्द, आता अशी लढऊ शकतील निवडणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लेखापरीक्षण अहवाल आणि प्राप्तिकर खात्याकडे जमा केलेले विवरण वेळेत सादर न केल्याने राज्य निवडणूक आयोगाने राज्यात दोन आमदार असलेल्या एमआयएमसह १९१ अमान्यतापात्र राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली. पुढील तीन महिन्यांत कागदपत्रांची पूर्तता आणि दंड भरल्यास या पक्षांना पुन्हा नोंदणी बहाल केली जाऊ शकते. मात्र तोपर्यंत त्या पक्ष आणि आघाड्यांतील सदस्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही.
मराठा सेवासंघप्रणीत शिवराज्य पक्ष, लातूरच्या टी.एम. कांबळेंनी स्थापलेल्या डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्षासह लोकसत्ता पक्ष यांचाही १९१ पक्षांत समावेश आहे. नोंदणी रद्द झाल्यामुळे या राजकीय पक्षांना राज्यात पक्षीय पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढता येणार नाहीत. या पक्षांना खुल्या वर्गवारीतील राखीव बोधचिन्ह मिळू शकणार नाहीत. त्यांच्या सदस्यांना आता अपक्ष म्हणून किंवा अन्य पक्षांच्या तिकिटांवर निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय उरणार नाही. हे राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना एबी फार्म देऊ शकणार नाही. मात्र पुढील तीन महिन्यात कागदपत्रांची पूर्तता केल्यास आणि १ लाख दंड भरल्यास या राजकीय पक्षांची पुन्हा नोंदणी केली जाईल.
‘राजकीय पक्ष नोंदणी आदेश, २००४ व २००९’ आणि ‘महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, २००९’ नुसार राज्य निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी केलेल्या राजकीय पक्षास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी चिन्ह वाटपात प्राधान्य दिले जाते.
राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण ३५९ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यात १७ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून उर्वरित सर्व ३४२ अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. या पक्षांना नोंदणी आदेशानुसार प्राप्तीकर विवरणपत्र भरल्याची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे. परंतु ही कागदपत्रे सादर न केल्यामुळे एकूण ३२६ राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही विहित मुदतीत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यापैकी १९१ पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज.स. सहारिया यांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा लाभ :
एमआयएम हा पक्ष प्रामुख्याने अल्पसंख्यंक मुस्लिम समुदायाच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण करतो. धर्मनिरपेक्ष विचाराचे आपण पाठीराखे आहोत असा दावा करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आजवर मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर मतदान करीत आला आहे. यावेळेस लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मात्र मु्स्लिम मतदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारून एमआयएमला मतदान केले आणि विधानसभेत या पक्षाचे दोन आमदार निवडून आले. एवढेच नव्हेत औरंगाबादसह अनेक महापालिकेत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. एमअायएम जर आपली नोंदणी वेळेत परत मिळवू शकला नाही तर याचा लाभ आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल, असे बोलले जात आहे.
पुन्हा होईल नोंदणी
आम्ही चार महिन्यांपूर्वीच सर्व कागदपत्रे आयोगाला दिली आहेत. तरीही नोंदणी का रद्द झाली हे पाहून ती कागदपत्रे सादर करू. पुढच्या तीन महिन्यांत पुन्हा एमआयएमची नोंदणी होईल. - इम्तियाज जलील, आमदार
मराठवाड्यातील पक्ष, आघाड्या
औरंगाबाद :
शहर प्रगती आघाडी, स्वाभिमानी सेना, सिल्लोड शहर परिवर्तन विकास आघाडी, लोकशाही विचार मंच, सिल्लोड शहर विकास आघाडी, बहुजनवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र जनसंग्राम पार्टी.
बीड : प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी,अंबाजोगाई विकास आघाडी, बीड विकास आघाडी.
नांदेड: संविधान पार्टी, बिलोली शहर विकास आघाडी, महाराष्ट्र पीपल्स पार्टी.
जालना : भीमसेना पँथर्स पार्टी (महाराष्ट्र)
लातूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक), भारतीय ज्वालाशक्ती पक्ष.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अजून कोणकोणत्‍या 191 पक्षांची नोंदणी केली रद्द...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...