आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ- मराठवाड्यातील दूध उत्पादन वाढीसाठी करार, जाेडधंद्याला प्राेत्साहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादन वाढीसाठी तसेच त्या भागातील उत्पादित दूध संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ संचालित मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रा. लि. या कंपनीशी राज्य सरकारने करार केला अाहे. यामुळे मराठवाडा व विदर्भातील दोन हजार गावांतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.

राज्य सरकार व मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रा.लि. कंपनी यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी सामंजस्य करार झाला. या वेळी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे चेअरमन दिलीप रथ, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त आर. जी. कुलकर्णी, मदर डेअरीचे कार्यकारी संचालक एस. नागराजन, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘नागपूर येथील दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या अखत्यारीतील २१.८६ एकर जमिनीपैकी ९.८८ एकर जमीन, तेथील दुग्ध शाळेची इमारत, गाेदाम, बॉयलर, दूध भुकटी प्रकल्प, ट्रक टर्मिनल तसेच यंत्र सामग्री ३० वर्षांसाठी नाममात्र भाडेतत्त्वावर ‘मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल’ कंपनीला देण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भ- मराठवाड्यातील दुधाळ जनावरांच्या उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार आहे. विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्रम राबवणार असून त्याचा विदर्भ व मराठवाड्यातील दोन हजार गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा हाेणार आहे, तसेच ६० हजार ग्रामीण कुटुंबांना उपजीविकेचे साधन मिळणार आहे.’ या करारावर राज्य शासनातर्फे नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रा.लि. कंपनीचे कार्यकारी संचालक एस. नागराजन यांनी स्वाक्षरी केल्या.
बातम्या आणखी आहेत...