आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षरतेमध्ये हिंदूंपेक्षा मुस्लिम आघाडीवर, आर्थिक पाहणी अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने मुस्लिम तरुणांची प्रगती होत नसल्याचे म्हटले जाते. परंतु राज्याच्या २०१५-१६ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार साक्षरतेच्या टक्केवारीत मुस्लिमांनी हिंदूंपेक्षा अाघाडी घेतल्याचे दिसून येते. राज्यातील मुस्लिमांचे लोकसंख्येच्या तुलनेच साक्षरतेचे प्रमाण ८३.६ टक्के आहे. ग्रामीण भागात हे ७९.१ टक्के, तर शहरात ८५.२ टक्के प्रमाण आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात मुस्लिमांच्या साक्षरतेचा दर ६८.५ टक्के आहे जो अन्य सर्व धर्मियांपेक्षा कमी आहे. दुसरीकडे राज्यात हिंदूंचे साक्षरतेचे ८१.८ टक्के आहे. यामध्ये ग्रामीण भागात ७६.७ तर शहरी भागात ८९.३ असे प्रमाण आहे.

हा आर्थिक पाहणी अहवाल सन २०११ च्या आकडेवारीवर आधारित आहे. हिंदू, मुस्लिम, खिश्चन, शीख, बौद्ध व जैन यांची धर्मनिहाय लोकसंख्येबाबतची आकडेवारी या अहवालात असून या धर्मांमधील साक्षरतेचे प्रमाणही देण्यात आले आहे. आकडेवारीनुसार, सर्व धर्माच्या लोकसंख्येचा दशवार्षिक दर कमी झाला असून, राज्य पातळीवर एकंदरीत वृद्धीदरात ६.७ टक्के अंकांची घट नोंदविण्यात आली आहे. ख्रिश्चन समुदायाची लोकसंख्या राज्यात एक टक्का असून साक्षरतेचा दर ९२.३ टक्के आहे. ख्रिश्चन समाजाचे लिंग गुणोत्तर सगळ्यात जास्त म्हणजे १०३१ आहे. शीख समाजाची संख्या ०.२ टक्के असून साक्षरतेचा दर ९०.९ टक्के आहे. तर लिंग गुणोत्तर प्रमाण सगळ्यात कमी म्हणजे ८९१ आहे.

राज्यात बौद्ध धर्मियांची संख्या ५.८ टक्के असून साक्षरतेचे प्रमाण ८३.२ टक्के आहे. जैन समुदाय १.२ टक्के असून त्यांचे साक्षरतेचे प्रमाण ९५.३ टक्के आहे. लिंग गुणोत्तरामध्ये ख्रिश्चनानंतर बौद्ध धर्मीयांचा क्रमांक लागतो. शहरी भागात लिंग गुणोत्तराचे प्रमाण ९६३ आणि शहरी भागात ९७८ आहे. तर जैन धर्मियांमध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण ग्रामीण आणि नागरी भागात अनुक्रमे ९२२ आणि ९७४ आहे. हिंदू धर्मियांचे लिंग गुणोत्तर प्रमाण ग्रामीण भागात ९५१ आहे तर शहरी भागात हेच प्रमाण फक्त ८९४ आहे. मुस्लिमांचे लिंग गुणोत्तर ग्रामीण भागात ९५९ आणि शहरी भागात ८९३ आहे.