मुंबई - केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर उगवत्या सूर्याला नमस्कार या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र साहित्य महामंडळाने धोरण स्वीकारले आहे. भाजपचे केंद्रीय ग्रामविकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी घुमान येथे एप्रिलमध्ये होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून भूमिका बजावणार आहेत. काही दिवसांपूर्वीच गडकरी यांनी संमेलनाचे आयोजक संजय नहार यांच्याकडून यासंदर्भातील पत्र स्वीकारले आहे.
गडकरी केवळ उद्घाटक म्हणूनच भूमिका बजावणार नसून संमेलनस्थळ घुमान हे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र व्हावे यासाठीही प्रयत्न करीत आहेत. म्हणूनही त्यांनाच उद्घाटक म्हणून मान देण्याचा घाट संमेलनाच्या आयोजकांनी घातला आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून गडकरी यांच्या नावाची सुरुवातीला चर्चा होती. मात्र, आता उद्योजक व संमेलनाचे निमंत्रक भारत देसडला हे स्वागताध्यक्ष असणार आहेत. दरम्यान, घुमानला येणा-या साहित्यप्रेमींसाठी रेल्वेच्या तिकीटदरांमध्ये सवलती देण्याचेही गडकरींकरवी कार्य केले जावे यासाठीही संमेलनाचे आयोजक प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.
अध्यक्ष निवड १० डिसेंबरला
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण याचा निकाल येत्या दहा डिसेंबर रोजी लागणार आहे. विदर्भातील पुरुषोत्तम नागपुरे, सदानंद मोरे, भारत सासणे, श्रीपाल सबनीस ही निवडणूक लढवत आहेत.
राष्ट्रीय तीर्थक्षेत्रासाठी प्रयत्न
काही दिवसांपूर्वी आम्ही नितीन गडकरी यांना भेटलो होतो. त्यांनी उद्घाटक म्हणून आमचे आमंत्रण स्वीकारले आहे. तसेच घुमान राष्ट्रीय तीर्थक्षेत्र होण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.- संजय नहार, आयोजक