आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Sahitya Sanmelan Mandal News In Marathi, Nitin Gadkari

नितीन गडकरी स्वागताध्यक्ष, सारस्वत गप‘घुमान’; युतीच्या डावपेचांना मंडळाचे बळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- साहित्याच्या प्रांतात शिवसेना किंवा भाजपला फारसे स्वारस्य कधी दिसले नाही, पण केंद्रात सत्तेवर येताच युतीने हा प्रांतही काबीज करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्याचाच भाग म्हणून घुमानमध्ये होणार्‍या 88 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर अनावरण झाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी साहित्यिकांना बैलाची उपमा दिल्याने एकेकाळी आगपाखड करणारे साहित्य वर्तुळ मात्र यावर गप्प दिसले. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारावे म्हणून अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून विनंती केली आहे.
फेब्रुवारीत होणार्‍या संमेलनाआधी राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. कदाचित राज्यात युतीची सत्ता येऊ शकते हे पाहूनच 7 महिन्यांचा अवधी असतानाही महामंडळ बोधचिन्ह प्रकाशन, स्वागताध्यक्षासारखे निर्णय घेत असल्याची चर्चा आहे. राज्यात आघाडीला सत्तेवरून खेचायला वेळ असला तरी साहित्याच्या राजकारणात युतीने आघाडी घेतली आहे.

‘मातोश्री’वर बोधचिन्ह अनावरण, साहित्यिकांचा ‘मौन राग’
‘मातोश्री’वर संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण झाल्यानंतर साहित्यवर्तुळात त्याचे तीव्र पडसाद उमटतील, अशी शक्यता होती. गतवर्षी चिपळूण येथे झालेल्या संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेबांचे नाव देण्यावरूनही खडाजंगी झाली होती. मात्र या वेळी साहित्यिकांनी मौन बाळगणे पसंत केले आहे. संमेलनाच्या बाबतीत रोज अशा घटना आता घडत राहणार, असाच सूर चिपळूण संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, समीक्षक द. भि. कुलकर्णी, साहित्यिक राजन खान यांसारख्या साहित्यिकांनी लावल्याचे दिसते.

निर्णय झाला नाही
गडकरी यांना स्वागताध्यक्ष होण्याची विनंती करण्यासाठी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी गडकरी यांची भेट घेतली होती. मात्र यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.
- माधवी वैद्य, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ