मुंबई - मराठी चित्रपटाचा स्तर उंचावत असून मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइम मिळावा यासाठी सक्ती केली जाईल. तसेच सीबीएसई, आयसीएसई शाळांत मराठी बंधनकारक करणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. सोमवारी नियम २९३ अन्वये सदस्यांनी मराठी भाषा संवर्धन, गड किल्ले, लोककला, बोलीभाषा, चित्रपट, नाटक, क्रीडा विषयांवर चर्चा उपस्थित केली.
या चर्चेला उत्तर देताना तावडे म्हणाले की, दादासाहेब फाळके यांची माहिती देणारी चित्रफीत प्रत्येक चित्रपटगृहात राष्ट्रगीतानंतर दाखवण्याचा विचार आम्ही करीत आहाेत. ज्या भाषेतील चित्रपट असेल त्याच भाषेत ही चित्रफीत असेल. तसेच गोरेगाव येथील फिल्मसिटीचा विकास करताना तेथे एनएसडीच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाची उभारणी केली जाईल. पुरस्कारप्राप्त एकां
किका जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी एकां
किका महोत्सव भरवण्यात येणार असल्याचेही विनोद तावडे यांनी सांगितले.
मराठवाड्यातही पुस्तकांचे गाव
ब्रिटनमध्येहे ऑन वे हे पुस्तकांचे गाव असून त्याच धर्तीवर राज्यात महाबळेश्वर वा गणपतीपुळे येथे पुस्तकांच्या गावाची उभारणी केली जाणार आहे. या गावाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास विदर्भ आणि मराठवाड्यातही अशी पुस्तकांची गावे उभारली जातील, असे तावडे म्हणाले. बौद्धिक पर्यटनाचा हा अनोखा प्रयोग असून महापालिका आणि नगरपालिकांच्या संकुलांमध्ये मराठी भाषा पुस्तकांच्या विक्रीसाठीचा कमी दराने गाळा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही तावडे यांनी केली.
आर.के. लक्ष्मण यांचे स्मारक
मुंबईच्याजे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये जगप्रसिद्ध दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे स्मारक उभारण्याचा सरकारचा विचार असून रुडयार्ड किपलिंग यांचेही स्मारक उभारण्यात येणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले. दिवंगत शाहीर साबळेंच्या नावाने दरवर्षी एका शाहिराला राज्य शासन पुरस्कार देईल अशी घोषणा करीत राज्यातील सर्व वयोवृद्ध कलावंतांचे मानधन दिवाळीपासून बँक खात्यात थेट जमा करणार असल्याचेही तावडे म्हणाले.
रायगडावर महोत्सव घेणार
गडकिल्लेसंवर्धन समिती आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या सचिवांची समिती नेमली जाईल. रायगड महोत्सव आयोजित करण्याची योजना असून या वेळी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रयोग सादर केला जाईल आणि त्यासाठी शिवसृष्टी उभारली जाईल, असेही तावडे म्हणाले.
बोलीभाषांचे डिजिटायझेशन
राज्यात मराठी टक्का वाढावा यासाठी सीबीएसई आणि आयसीएसई शाळांमध्ये मराठी विषय शिकवण्याबाबत
आपण या शाळांच्या संचालकांशी बोलणार आहोत. राज्यातील एकही बोलीभाषा नष्ट होऊ दिली जाणार नाही. यासाठी ६० बोलीभाषांचे डिजिटायझेशन करणार आहोत. राज्याच्या १९९ कायद्यांमध्ये अजूनही बॉम्बे असा उल्लेख आहे. बॉम्बेऐवजी मुंबई असा उल्लेख व्हावा म्हणून विधी न्याय विभागाला विनंती करण्यात आल्याची माहितीही तावडे यांनी दिली.