आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Theatre News In Marathi, Drama, Divya Marathi

राज्य नाट्य स्पर्धेत ‘ठष्ट’ची बाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 26 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अद्वैत आणि अश्वमी थिएटरच्या संजय पवार लिखित व दिग्दर्शित ‘ठष्ट’ या नाटकाने बाजी मारली. या नाटकास रुपये पाच लाखांचे प्रथम पारितोषिक राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने जाहीर केले आहे. या नाटकाखेरीज ‘गेट वेल सून’ या नाटकाने तीन लाखांचे द्वितीय पारितोषिक आणि ‘थोडंसं लॉजिक थोडंसं मॅजिक’ या नाटकाने रुपये दोन लाखांचे तृतीय पारितोषिक या स्पर्धेत पटकावले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘ठष्ट’ या नाटकास उत्कृष्ट दिग्दर्शन (द्वितीय पारितोषिक), उत्कृष्ट लेखन (प्रथम पारितोषिक) तसेच या नाटकातील हेमांगी कवी, सुपर्णा श्याम यांना उत्कृष्ट स्त्री अभिनेत्री म्हणून पारितोषिक जाहीर झाले आहे. तसेच चंद्रकांत कुलकर्णी यांना ‘गेट वेल सून’च्या दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक तर ‘थोडंसं लॉजिक थोडंसं मॅजिक’ या नाटकाच्या दिग्दर्शन व लेखनासाठी राजीव शिंदे यांना तृतीय पारितोषिक मिळाले आहे.

नेपथ्यासाठी ‘ठष्ट’ नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. विशेष म्हणजे ‘ठष्ट’ व ‘नकळत दिसले सारे’ या दोन्ही नाटकांच्या नेपथ्यासाठी प्रदीप मुळ्ये यांना अनुक्रमे प्रथम व तृतीय पारितोषिक मिळाले आहे, तर प्रशांत दळवी यांना ‘गेट वेल सून’ या नाटकाच्या लेखनासाठी
द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे.

मोहन जोशी उत्कृष्ट अभिनेता
‘थोडंसं लॉजिक थोडंसं मॅजिक’साठी मोहन जोशी यांना उत्कृष्ट पुरुष अभिनेता तर ‘एकदा पाहावं न करून’ या नाटकासाठी अभिजित केळकर, ‘घोळात घोळ’साठी हेमंत ढोमे, ‘नकळत दिसले सारे’साठी प्रशांत दामले आणि ‘गेट वेल सून’साठी स्वप्निल जोशी यांनाही उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नरेंद्र भिडे यांनादेखील ‘आषाढातील एक दिवस’ आणि ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ या दोन्ही नाटकांसाठी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय असे संगीत दिग्दर्शनासाठीचे पुरस्कार मिळाले.

‘ठष्ट’ सर्वतोपरी दखल
घेतल्याने समाधानी : पवार

नाटकाला अभिनय, दिग्दर्शन, लेखन नेपथ्यासाठी संचालनालयाने पारितोषिके जाहीर केली. त्यामुळे नाटकाची राज्य सरकारने सर्वतोपरी दखल घेतल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया ‘ठष्ट’ नाटकाचे लेखक व दिग्दर्शक संजय पवार यांनी व्यक्त केली.