आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या मंत्र्यांचा लोडशेडिंगमुळे भडका; पवारांच्या ऊर्जा खात्यावर नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळ आणि उन्हाच्या चटक्यांनी मेटाकुटीला आलेल्या मराठवाड्यावर महावितरणकडून भारनियमन लादले जात असल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळात बुधवारी चांगलीच चकमक झडली. मराठवाड्यातील मंत्र्यांनी या प्रश्नावर आपल्याच सरकारला धारेवर धरले असताना ऊर्जामंत्री अजित पवार मात्र गप्प होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ऊर्जा खाते बिल भरत नसल्याचे कारण देत दिवसेंदिवस लोडशेडिंग वाढवत चालले आहे. याविरोधात मराठवाड्यातील मंत्र्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत हा प्रकार ताबडतोब थांबला पाहिजे, अशी मागणी केली. यावर नेहमी आक्रमक असणारे अजित पवार आज मात्र शांत बसून होते. शेवटी मुख्यमंत्र्यांनी या तापलेल्या चर्चेत मध्यस्थी करत मुख्य सचिवांना ऊर्जा खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन यामधून मार्ग काढण्याचे आदेश दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टोपे, क्षीरसागर, चव्हाण आक्रमक
राज्यात सर्वाधिक लोडशेडिंग मराठवाड्यात आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर 14 तास लोडशेडिंग आहे. याविषयी राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, अब्दुल सत्तार, मधुकर चव्हाण या मंत्र्यांनी अजित पवारांच्या ऊर्जा खात्याच्या दादागिरीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. लोडशेडिंग कमी झाली नाही, तर लोकांच्या रागाचा फटका विधानसभेत बसू शकतो, यावर या सर्वच मंत्र्यांनी भर दिला. यावर पवारांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, असे समजते.

पोलिसांच्या कामकाजावरही टीका
लोडशेडिंग वाढण्याचे कारण सांगताना मेहता यांनी राज्यात अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्र्मस चोरीला जात असल्याचे सांगितले, तेव्हा सारे मंत्रिमंडळच थक्क झाले. ‘इतके अवजड ट्रान्सफॉर्र्मस चोरीला जातातच कसे, पोलिस काय करत आहेत?’ अशा प्रश्नांची सरबत्ती झाली तेव्हा राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती काय असेल, याची कल्पना येते, असे टोमणेही आबांना लगावण्यात आले. विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात लोडशेडिंगचे चटके सत्ताधार्‍यांना बसू शकतात, हे लक्षात घेऊन याप्रश्नी लवकरच मार्ग काढला जाईल, अशी चिन्हे आहेत.

बिले न भरल्यास लोडशेडिंग होणारच : महावितरण
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी ऊर्जा खात्याची बाजू मांडली. जेथे वीज बिले नियमित भरली जातात तेथे लोडशेडिंग होत नाही. मात्र, वीज बिले भरण्याचे प्रमाण ज्या ठिकाणी कमी आहे, त्या ठिकाणी मात्र लोडशेडिंग केलेच जाते. तसे न केल्यास महावितरणची परिस्थिती गंभीर होईल, असेही सांगण्यास मेहता विसरले नाहीत. यामुळे मराठवाड्यातील मंत्री आणखी संतापले. लोकांपेक्षा कंपनी महत्त्वाची आहे का, असा जाब त्यांनी मेहतांना विचारला.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)