आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा सरकारला माफ करणार नाही, आमदार पंडित यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठवाडा आणि विदर्भ दोन्ही विभाग अनुशेषाच्या भरपाईसाठी झुंजत असताना फडणवीस सरकार विदर्भाला अधिक झुकते माप देत असून या पापाबद्दल मराठवाड्याची जनता सरकारला कधीच माफ करणार नाही, असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिला.

धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण, विक्रम काळे या सदस्यांनी मराठवाड्यातील दुष्काळाबाबत नियम २६० अन्वये चर्चा उपस्थित केली होती. मराठवाड्यातील जिल्हा बँकांची स्थिती वाईट आहे. असे असताना पंतप्रधान कार्यालय केवळ विदर्भातील जिल्हा बँकांना
मदत केल्याचे नमूद करत सरकार मराठवाड्याबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

१९८६ मध्ये दांडेकर समितीने मराठवाड्यातील सहा जिल्हे टंचाईचे असल्याचे म्हटले होते. २००७मध्ये राधाकृष्ण समितीने असेच मत दिले. तरीसुद्धा २०१४ मध्ये केळकर समितीने आपल्या अहवालात मराठवाड्याचा संदर्भ न देता विदर्भातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची शिफारस केल्याबद्दल पंडित यांनी कठोर शब्दांत टीका केली. मराठवाड्यातील रेल्वे रुळात वर्षभरात एक मीटरची वाढ होत नाही. मराठवाड्याच्या विकासाचा राज्यपालांच्या अभिभाषणात साधा उल्लेखही नसतो. आयआयएम देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मराठवाड्याला डावलून विदर्भाची निवड कशी होते, असा सवाल पंडित यांनी केला.

मराठवाड्यातील शेतक-यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर कापसाला भाव द्या, सर्व बंधारे वर्षातून एकदा भरून द्या, विदर्भाप्रमाणे सामूहिक विवाहाचे पॅकेज द्या अशी आमदार पंडित यांनी या वेळी बाेलताना मागणी केली.