आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी सत्ताधारीच झाले आक्रमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर शुक्रवारी मराठवाड्यातील सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत विधिमंडळ दणाणून सोडले. ‘मराठवाड्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे १२ हजार कोटी रुपयांची तातडीने गरज आहे. हा निधी सरकार कधी उपलब्ध करून देणार आहे?’ असा खडा सवाल त्यांनी सरकारला केला. आमदारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांसंबंधातील वेगळी चर्चा घ्यावी, असा आदेश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिला.
अर्जुन खोतकर आणि जयप्रकाश मुंदडा (शिवसेना), प्रशांत बंब (भाजप), डॉ. शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) या सदस्यांनी मराठवाड्यातील १२९ प्रकल्प निधीअभावी रखडत पडल्याचा मुद्द्याकडे विधानसभेचे लक्ष वेधले. सिंचनाचे प्रकल्प रखडत पडल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या गंभीर संकटाला सामोरे जात असलेल्या मराठवाड्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे या आमदारांनी विधानसभेत मांडले. यावर मराठवाड्यातील ९५० कोटी रुपयांच्या १५ प्रकल्पांची कामे यंदा सुरू केली आहेत, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. आमदारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांवर स्वतंत्र चर्चा घ्या, असे आदेश विधानसभाध्यक्षांनी सरकारला दिले आहेत.
निकष बाजूला ठेवा
मराठवाडा पारंपरिक दुष्काळी भाग आहे. या भागातल्या शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही निवडून येतो. त्यांच्या जमिनीला पाणी देणारे प्रकल्प कधी पूर्ण होणार? यासाठी राज्य सरकार तातडीने १२ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार आहे का? ७० टक्के काम पूर्ण झालेले, ५० टक्के पूर्ण झालेले असले निकष बाजूला ठेवून मराठवाड्यातल्या सगळ्या अपूर्ण कामांना शासन गती देणार आहे का?-अर्जुन खोतकर, आमदार, जालना

स्वतंत्र चर्चा ठेवा
मराठवाड्यातील शेतकरी गेल्या ३ वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. बाकी सगळ्या चर्चा-विषय बाजूला ठेवा. ही काय चेष्टा लावलीय विरोधकांनी? दुष्काळी भागातील प्रकल्प पूर्ण करण्याला राज्यपालांनीही प्राधान्य दिले आहे. म्हणूनच फक्त मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर स्वतंत्र चर्चा ठेवली पाहिजे. प्रश्नोतराच्या तासाभरात आमच्या विषयाला न्याय मिळणार नाही.
-प्रशांत बंब, आमदार, गंगापूर

सरकारचा वचकच नाही - पंडित : राज्यात भीषण दुष्काळ असताना प्रशासनाची भूमिका नकारात्मक अाहे. मराठवाड्यात मनरेगाची पुरेशी कामे नाहीत. टँकर्स वेळेवर येत नाहीत. जलयुक्त शिवारची कामेही सुरु नाहीत. सरकारचा प्रशासनावर वचक नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली, अशी टीका राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत कर्जामाफीच्या प्रस्तावावरील चर्चेत केली.

७१ प्रकल्प अपूर्णच
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे मराठवाड्यातील ७१ प्रकल्प अपूर्ण असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. राज्याची आर्थिक स्थिती आणि अनुशेष यासंदर्भातले राज्यपालांचे निर्देश लक्षात घेऊनच या प्रकल्पांसाठी निधी द्यावा लागेल. त्यामुळे सर्वच अपूर्ण प्रकल्पांना एकाच वेळी निधी देणे शक्य नाही, असे महाजन यांनी उत्तरात स्पष्ट केले.

टप्प्याटप्प्याने प्रकल्प पूर्ण करण्याची योजना
सर्व प्रकल्प एकदाच पूर्ण करणे अशक्य असल्याने पहिल्या टप्प्यात ७० व दुसऱ्या टप्प्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम झालेले प्रकल्प पूर्ण करू, असे महाजन म्हणाले.

चर्चा सुरू असताना अजित पवारांनी साेडले सभागृह
मराठवाड्यातील अपूर्ण प्रकल्पांच्या चर्चेत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी''च्या आमदारांनी भाग घेतला नाही. ही चर्चा सुरू असताना अजित पवार सदनातून निघून गेले.
बातम्या आणखी आहेत...