आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mard 4000 Doctor On Strike For Acction Against Dean Dr. Lahane

मार्डचे ४,००० डॉक्टर संपावर, रुग्णांचे हाल, डीन डाॅ.लहानेंवर कारवाईची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जे.जे. रुग्णालयातील दोन वरिष्ठ डॉक्टरांच्या बदलीच्या मागणीसाठी मार्डने दिलेल्या हाकेप्रमाणे राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयांतील ४००० हून अधिक निवासी डॉक्टर शुक्रवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयांत रुग्णांचे हाल होत आहेत. संपकरी डॉक्टरांवर महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (मेस्मा) लागू करावा, अशी शिफारस राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने केली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा डाॅक्टरांना या नाेटीसा बजावण्याचे अादेश देण्यात अाल्याचे वृत्त अाहे.
जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्या बदलीची मागणी डॉक्टर करत आहेत. या मागणीसाठी राज्यातील ४००० हून अधिक निवासी डॉक्टर शुक्रवारी सकाळपासून संपावर गेले आहेत. जोपर्यंत सरकार आमची मागणी मान्य करत नाही आणि बदलीचे लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील, असे मार्डच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. आम्ही फक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवा देत आहोत. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील बाह्य रुग्ण विभाग मात्र शुक्रवारी सकाळी वाजेपासून बंद आहेत. डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. पारेख हे विद्यार्थ्यांचा छळ करत असून ते त्यांच्या पदावर रहाण्यास पात्र नाहीत’, असेही हा पदाधिकारी म्हणाला.
वैद्यकीय शिक्षण संचालनालय मेस्मा लावण्याची तयारी करत आहे, त्याबद्दल विचारले असताना मार्डचा हा पदाधिकारी म्हणाला की, मेस्मा हा फक्त पूर्णवेळ सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतो. आम्ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहोत. आमच्यावर ते मेस्मा कसा काय लावू शकतात? दरम्यान, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी संपकरी डॉक्टरांचा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. यापूर्वी निवासी डॉक्टरांवर मेस्मा लावण्यात आला आहे. एखादी विशिष्ट सेवा मेस्माअंतर्गत येऊ शकते, हे घोषित करण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे, असे डॉ. शिनगारे म्हणाले.