आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवासी डाॅक्टरांचा संप मागे, मुंबईत चिमुकलीचा मृत्यू, ४००० डाॅक्टर कामावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डाॅक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेने पुकारलेला संप शुक्रवारी सायंकाळी अखेर मागे घेण्यात अाला. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांची दुपारी मंत्रालयात प्रदीर्घ बैठक झाली. त्यात बहुतांश मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डाॅ. सागर मुंदडा यांनी जाहीर केले. तत्पूर्वी मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचाराअभावी एका चिमुकलीचा मृत्यू झाला.

राज्यातील १४ शासकीय महाविद्यालयातील ४ हजार निवासी डाॅक्टर गुरुवारपासून बेमुदत संपावर गेले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. शासकीय रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद पडले होते. परिणामी, रुग्णांचे दोन दिवस मोठे हाल झाले. मुंबईतील केईएम, नायर, सायन या पालिकेच्या तर सेंट जाॅर्ज या शासकीय रुग्णालयात आलेल्या रुग्णांना मोठा फटका बसला. ‘केईएम’मध्ये मोहम्मद सोहिल या भाजलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा अाराेप सोहिलच्या पालकांनी केला आहे. केईएम, सायन व नायर या पालिकेच्या मुंबईतील बड्या रुग्णालयात एकूण १९७२ निवासी डाॅक्टर आहेत. त्यातील तब्बल १५९० डाॅक्टर संपात सहभागी झाले होते.
दरम्यान, संप मागे घेतल्यानंतर सर्व डाॅक्टर रात्रीच कामावर रुजू झाल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात अाले.

रक्तदान करणार
दोन दिवसांच्या संपामुळे राज्यातील रुग्णांचे मोठे हाल झाले. त्याची कसर भरून काढण्यासाठी १४ शासकीय महाविद्यालयांतील सुमारे चार हजार डाॅक्टरांनी १५ आॅगस्ट राेजी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. सागर मुंदडा यांनी दिली.
पालिकेचा दावा
मुंबईतील केईएम, सायन व नायर रुग्णालयात संपाच्या दुसऱ्या दिवशी ४,२९३ बाह्यरुग्ण तपासण्यात अाले. ३,३२४ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे. ४० मोठ्या, तर ७० महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला अाहे.
या मागण्या मान्य
१. निवासी डाॅक्टरांच्या एस. आर. पदांना बाँड लागू राहील.
२. बाँडधारक वैद्यकीय उमेदवारांना व्याख्यातापदासाठी प्राधान्य
३. ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे, त्यातच बाँड करावा, अन्यथा ४५ दिवसांनी असे विद्यार्थी बाँडमुक्त ठरतील.
४. डाॅक्टरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात कालमर्यादा ठरण्यात येईल.
५. विद्यावेतनात एक अाॅगस्टपासून ५ हजारांची वाढ .
६. ओबीसी, एससी व एसटी फ्रीशिप संदर्भात समाज कल्याण मंत्रालयाशी चर्चा केली जाईल .
७. शुल्क निर्धारणसंदर्भात वित्त मंत्रालयाशी चर्चा केली जाईल.
८. क्षयाची बाधा झालेल्या डाॅक्टरांसाठी व बाळंतपणाच्या रजेसंदर्भात मार्ड व वैद्यकीय िवभाग ‘एमसीआय’कडे प्रस्ताव पाठवेल.
९. डाॅ. हुमने यांची खातेनिहाय चौकशी एका वर्षाच्या अात पूर्ण हाेईल.