आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marine Drive To Get Its Yellow Glow For Queen's Necklace

'क्वीन्स नेकलेस' मरिन ड्राइव्हला पुन्हा मिळाली सोनेरी झळाळी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मायानगरी मुंबईची ओळख असलेल्या मरिन ड्राइव्हला पुन्हा एकदा सोनेरी झळाळी प्राप्त झाली आहे. पिवळे एलईडी दिवे बसविल्याने मरिन ड्राइव्हची क्वीन्स नेकलेस ही शान परत आली आहे. गेल्या वर्षी सोडियम व्हेपरचे पिवळ्या रंगाचे दिवे काढून पांढ-या रंगाचे एलईडी दिवे बसविण्यात आले होते. मात्र, या पांढ-या रंगाच्या दिव्यामुळे मुंबईचे सौंदर्य ठिकाण मरिन ड्राइव्हची चकाकी व झळाळी नष्ट झाली होती. याविरोधात शिवसेनेने आवाज उठविल्यानंतर कोर्टानेही मरिन ड्राइव्हवर पांढ-याऐवजी पिवळे एलईडी दिवे बसवा असे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने पुन्हा कार्यवाही सुरु केली आहे. 26 जानेवारीच्या निमित्ताने मरिन ड्राइव्ह किनारपट्टीवर नरिमन पॉईंट ते पोलिस जिमखान्यापर्यंत 250 बल्ब बसविण्यात आले.
देशभर ऊर्जेची व पर्यायाने पैशांची बचत व्हावी या हेतूने मोदी सरकारने भारतातील सर्व बड्या शहरासह सर्वत्र पांढरे एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई महापालिकेला सध्या रस्त्यावरील लाईटसाठी 164 कोटी रूपये बिलापोटी मोजावे लागतात. पांढरे दिवे बसविल्यानंतर या बिलात निम्मी कपात होणार होती. मात्र, हेरिटज असलेल्या मरिन ड्राइव्हच्या क्विन नेकलेसची रया गेल्याचे बोलले गेले. शिवसेनेने यावर सर्वप्रथम आवाज उठविला. त्यानंतर ते प्रकरण कोर्टात गेले.
पांढरे दिवे तातडीने काढा आणि त्या जागी पिवळे दिवे लावा. क्वीन्स नेकलेसची रया जाईल असे काही करू नका. पिवळ्या रंगाने परिसराला जी शोभा येते, ती कायम राखा असे आदेश हायकोर्टाने दिले. कोर्टाच्या या आदेशानंतर या एलईडी दिव्यांचा पुरवठा करणा-या एनर्जी सर्व्हिस कंपनीने हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली. एलईडी दिव्यांच्या रंगाबाबत आक्षेप असेल तर एलईडीचे पिवळे दिवेही उपलब्ध आहेत. आम्ही नेकलेसची रया जाणार नाही, याची काळजी घेऊ. पिवळे दिवे लावण्याची परवानगी द्या, अशी विनंती या कंपनीने हायकोर्टाला केली. कोर्टाने ही विनंती मान्य केली. कोणत्या रंगाचे दिवे लावावेत किंवा असावेत यावर आमचा आक्षेप नाही. परंतू पूर्वीच्या दिव्यांनी जी शान येत होती ती कायम राखली गेली पाहिजे, एवढेच आमचे म्हणणे आहे असे सांगत पिवळे एलईडी दिवे बसविण्याचा हिरवा झेंडा दाखविला होता.
मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे काहीसे दुर्लक्ष केले होते. यामुळे शिवसेनेने पालिका आयुक्त अजेय मेहता यांना निवेदन देऊन 26 जानेवारीपर्यंत पिवळे दिवे लावण्याचा अल्टीमेटम दिला होता. शिवसेनेने दिलेल्या इशा-यानंतर महापालिकेने अखेर पिवळे एलईडी दिवे बदलण्यास सुरुवात केली असून पहिल्या दिवशी 250 दिवे बसविले. आता उर्वरित दिवे बसविण्याचे काम सुरु आहे.