आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुण गवळीच्या मुलाचे लग्न!, वरपिता जेलमध्ये, आमंत्रितांमध्ये नेते अन् पाेलिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नागपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डाॅन अरुण गवळीच्या मुलाचे लग्न ९ मे रोजी होणार आहे. या विवाह साेहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे निमंत्रण थेट राजकीय पक्षांच्या प्रमुखांपासून ते पाेलिस अधिकाऱ्यांपर्यंत देण्यात आले आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंपासून ते मुंबईचे पाेलिस आयुक्त राकेश मारिया यांचा समावेश आहे. आता यापैकी किती ‘वऱ्हाडी' प्रत्यक्षात लग्नाला हजेरी लावतात याकडे सर्वांचीच नजर असणार आहे.

नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात गवळी सध्या शिक्षा भाेगत अाहे. त्याचा मुलगा महेश याचा विवाह ९ मे रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होत अाहे. या विवाहाला हजर राहण्यासाठी आपल्याला एक महिन्याचा पॅराेल रजा मिळावी, असा अर्ज गवळीने कारागृह प्रशानसाकडे मार्चमध्येच केला होता. मात्र, गुरुवारी ही त्याची विनंती फेटाळण्यात अाली. असे असले तरी या लग्नाची जय्यत तयारी केली जात अाहे.

गवळी यांची कन्या आणि नगरसेविका गीता गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अनेक बड्या व्यक्तींना या साेहळ्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे. त्यात उद्धव, राज यांच्याप्रमाणे राजकीय नेते तर असतीलच, पण पाेलिस अिधकारी तसेच उद्योगपती, बिल्डर यांचाही समावेश असेल.

मुलगा बिल्डर, सून काॅलेेजकन्या!
गवळीचा मुलगा बिल्डर असून त्याचा विवाह नागपूरच्या कृतिका अहिर हिच्याशी होणार अाहे. ती नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकते. तिने भरतनाट्यमचेही धडे घेतले आहेत. नागपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या एका सामुदायिक विवाह सोहळ्यात महेश आणि कृतिकाची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांचेही सूर जुळले. कृतिकाने आपल्या कुटुंबीयांसह गवळीची जेलमध्ये भेटही घेतली. तिथे बोलणी झाल्यानंतर २० ऑगस्ट २०१४ रोजी या दाेघांचा साखरपुडा झाला.