आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व-हाडींनी वाचवले शंभर जणांचे प्राण, ठाण्यात चार मजली इमारत कोसळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई व ठाणे परिसरात इमारत कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी मध्यरात्री कळवा परिसरातील चार मजली इमारत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही. एका कुटुंबाकडे लग्नाची तयारी सुरू होती. व-हाडी मंडळींच्या सतर्कतेमुळे सुमारे 100 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. मात्र, 25 कुटुंबीय उघड्यावर आले आहेत.
कळवा येथील भुसारआळी परिसरात अन्नपूर्णा ही चार मजली इमारत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथे 25 कुटुंबे राहतात. इमारतीतील तेलंगे यांच्या घरी सोमवारी लग्नकार्य होते. त्यामुळे त्यांच्या घरातील सर्वच मंडळी रात्री उशिरापर्यंत जागी होती. रविवारी रात्री कुटुंबातील सर्वजण सकाळी लवकर उठायचे असल्याने झोपण्याची तयारी करत होते. याच वेळी हळूहळू इमारत ढासळत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यामुळे तेलंगेच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत इतर कुटुंबीयांना तातडीने जागे करून सुरक्षित जागी जाण्याच्या सूचना केल्या. काही वेळातच सर्वजण खुल्या जागेत आल्यानंतर काही मिनिटांतच ही इमारत कोसळली. तेलंगे कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे सर्वांचे प्राण वाचले. मात्र, त्यांच्या घरातील लग्नकार्यावर विरजण पडले. येथील रहिवाशांनी तेलंगेंचे मनापासून आभार मानले.