आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र सदन घोटाळा : छगन भुजबळ ३१ मार्चपर्यंत कोठडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांना विशेष न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

चौकशीदरम्यान भुजबळ यांनी प्रकृती बिघडल्याची तक्रार वारंवार केल्याने बुधवारचा संपूर्ण दिवस वाया गेल्याचे सांगत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भुजबळांच्या कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र चौकशीच्या नावाखाली ईडी निव्वळ वेळकाढूपणा करत असल्याचा खुद्द छगन भुजबळ यांनी केलेला दावा ग्राह्य धरून न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळली.
बुधवारी दिवसभर भुजबळांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर सेंट जॉर्ज आणि जे.जे. या दोन रुग्णालयांतील डाॅक्टर्सनी त्यांना तपासले. या तपासणीत भुजबळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे समोर येऊनही प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत भुजबळांनी चौकशीदरम्यान असहकार्याचे धोरण स्वीकारल्याचे ईडीचे वकील अॅड. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात सांगितले.
या युक्तिवादाला विरोध करताना भुजबळ यांचे वकील अॅड. प्रसाद ढाकेफळकर यांनी ६९ वर्षीय भुजबळांना २० वर्षांपासून असलेल्या दम्याचा उल्लेख केला. दोन्ही वकिलांच्या युक्तिवादानंतर भुजबळांनी ईडीच्या कार्यपद्धतीची तक्रार न्यायालयात केली होती.