आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायानगरीत हॉटेलिंग 24 तास खुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी, मायानगरी यासारखी अनेक बिरुदे असणा-या मुंबई शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट 24 तास खुली राहावीत यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणामुळे अद्याप या प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही. मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्याकडे गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली असून लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे.

पंचतारांकित सोडली तर मुंबईमध्ये 24 तास सुरू असणारी हॉटेल्स नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री खायचे असेल तर सर्वसामान्यांचे हाल होतात. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळखले जाते, पण येथील प्रमुख रेल्वे स्टेशनच्या परिसरातही हॉटेल्स जास्तीत जास्त रात्री 11.30 वाजेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे उशिरा प्रवास करणा-यांना अन्न जवळ बाळगावे लागते किंवा चिप्स, बिस्किटे खाऊन भूक भागवावी लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे स्टेशन, एअर पोर्ट, दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरांमध्ये रात्रभर हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव असल्याची माहिती मुख्य सचिव कार्यालयातील एका अधिका-याने दिली.

कशासाठी विरोध?
रात्रभर हॉटेल्स उघडी राहिल्यास निवासी भागामध्ये लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस या प्रस्तावाला मान्यता द्यायला तयार नाहीत. मात्र लवकरच याबाबत पोलिसांशी चर्चा करून हॉटेल रात्रभर खुली ठेवण्यासाठी परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही संबंधित अधिका-याने सांगितले.

एक खिडकी योजना
हॉटेल्स, बार यांना लागणा-या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचा प्रस्तावही बैठकीत ठेवण्यात आला होता.त्यावर एक समिती नेमून महापालिका,अग्निशमन दल, आरोग्य विभाग यांच्याकडून विविध परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था हॉटेल मालकांसाठी केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला.