छायाचित्र : जाहिरातीतील दृष्य
मुंबई - निवडणुकीच्या रणधुमाळीत वाहिन्यांवर सर्वच पक्षांच्या जाहिराती सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत आहे ती ‘माझे नाव शिवसेना’ ही जाहिरात. गरजूंना मदत करणारे तरुण- तरुणी
आपले नाव ‘शिवसेना’ सांगत असल्याचे त्यात दाखवण्यात आले आहे. रस्त्यावर उतरणा-यांची सेना अशी ओळख असलेल्या शिवसेनेची आता ‘सामान्यांच्या मदतीला धावून जाणारी सेना’ अशी नवी प्रतिमा निर्माण करण्याचा या जाहिरातीतून प्रयत्न आहे.
जाहिरातींचे दिग्दर्शन २६ वर्षीय नवज्योत बांदिवडेकरने केले आहे. सॅन फ्रान्सिस्को स्कूल ऑफ डिजिटल फिल्ममेकिंगमधून फिल्म मेकिंगचा कोर्स केलेल्या नवज्योतने सांगितले, की शिवसेनेचे अजय नाईक यांचा मुलगा सिद्धेश हा माझा चांगला मित्र. राजकीय पक्षाच्या जाहिरातींमध्ये गोष्ट नसते, त्यामुळे गोष्ट असलेली जाहिरात तयार करावी, असे वाटत होते. त्यामुळे नवज्योत, सिद्धेश यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्या वेळी ‘कोणावर टीका करायची नाही. सकारात्मक जाहिराती करा’ असे उद्धव यांनी सांगितले आणि या टीमने त्याप्रमाणे योजना आखली. ‘सर्व जाहिरातींमध्ये आम्ही उगवते कलाकार घेतले, कारण तेच आपले वाटले असते. आता या जाहिरातींची चांगली चर्चा होत असल्याने आमचा हा निर्णय यशस्वी झाला आहे,’ अशा भावनाही नवज्योतने बोलून दाखवल्या. शिवसेनेच्या प्रेमापोटी अनेकांनी या जाहिरातीत मोफत काम केल्याचेही त्याने आवर्जून सांगितले.
स्फोटातील जखमींना मदतीतून ‘शिवसेना’ नाव
‘मुंबई बॉम्बस्फोटानंतर शिवसेनेचे अजय नाईक काही शिवसैनिकांसह रक्तदान करायला रुग्णालयात गेले होते. तेव्हा काही जणांनी त्यांचे नाव विचारले. त्या वेळी नाईक यांनी आपले नाव ‘शिवसेना’ असल्याचे सांगितले होते,’ ही माहिती मला सिद्धेशकडून मिळाली. त्यावरूनच आम्ही शिवसेनेचे हे रूप जनतेसमोर आणण्याचा निश्चय केला, असे नवज्योत यांनी सांगितले. शिवसेना सामाजिक कामात अग्रेसर असते हे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंना खूपच आवडला’, असेही तो म्हणाला.