आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MCA Announced A Scholarship Of Rs.10,000 Per Month To Pranav Dhanawade

विक्रमादित्य प्रणव धनावडेला MCA कडून प्रतिमहिना 10 हजारांची स्कॉलरशिप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या वडीलांच्या रिक्षातून घरी जाताना प्रणव धनावडे - Divya Marathi
आपल्या वडीलांच्या रिक्षातून घरी जाताना प्रणव धनावडे
मुंबई- कल्याणमधील 15 वर्षांच्या मराठमोळ्या प्रणव धनावडेने मंगळवारी 327 चेंडूंत नाबाद 1009 धावा ठोकून जागतिक क्रिकेटमधील 117 वर्षांचा इतिहास मोडत एक अनोखा विश्वविक्रम नोंदवला. त्याच्या कामगिरीची दखल सर्वत्र घेतली जात त्याला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. रिक्षाचालकाचा मुलगा असलेल्या गुणवान प्रणवची आर्थिक चणचणीमुळे फरफट होऊ नये म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए)च्या वतीने पुढील 5 वर्षासाठी त्याला प्रतिमहिना 10 हजार रूपयांची स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएच्या वतीने प्रणवचा आज सत्कार करण्यात आला.
एमसीएच्या वतीने डॉ. पी व्ही शेट्टी आणि प्रा. डॉ. उन्मेष खानविलकर यांनी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावतीने आम्ही जाहीर करीत आहोत की, नाबाद 1009 धावा करून जागतिक विक्रम प्रस्थापित केलेल्या प्रणवला पुढील वर्षासाठी प्रतिमहिना 10 हजार रूपये स्कॉलरशिप दिली जाईल. या दरम्यान, त्याच्या खेळाचा दर्जा तपासून शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेतला जाईल. जानेवारी 2016 ते डिसेंबर 2012 पर्यंत ही स्कॉलरशिप प्रणवला देण्यात येईल.
आपल्याला माहित असेलच की, प्रणव धनावडे एका सामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. गरिबीमुळे आपल्याला क्रिकेटर होता आले नाही मात्र आपण मुलाला क्रिकेटर बनवू शकतो असे सांगत प्रणवचे वडील प्रशांत रोज दोन तास जास्तीची रिक्षा चालवतात व प्रणवच्या क्रिकेटवर पैसे खर्च करतात. प्रणवच्या कामगिरीची सर्वच स्तरातून दखल घेतली असून, त्याला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शिवसेना-मनसेच्या वतीने 1-1 लाख रूपये प्रणवला देण्यात येणार आहेत.
स्टॅनफोर्ड क्रिकेट इंडस्ट्रीज या क्रिकेटचे साहित्य बनवणा-या कंपनीने प्रणवला आयुष्यभर मोफत क्रिकेट किट देणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रणवने दोन दिवस SF कंपनीच्या बॅटने फलंदाजी करीत विश्वविक्रम रचला आहे. प्रणव याने विश्‍वविक्रम केल्यानंतर यापुढचा शिक्षणाचा व क्रिकेट प्रशिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी याआधीच केली आहे.