आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mca Election, Dr. Vijay Patil May Contest Againest Sharad Pawar

MCA निवडणूकीत शिवसेनेचा गनिमी कावा, शरद पवार विरूद्ध विजय पाटील \'सामना\'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. मुंबई क्रिकेटचे असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रमुख डॉ. विजय पाटील हे शिवसेनेच्या मदतीने रिंगणात उतरले आहेत. आज दुपारी विजय पाटील यांनी आपल्या पाठीराख्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करीत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. विजय पाटील आज पवारांच्या विरोधात अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करतील. विजय पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच उद्धव यांनी विजय पाटलांना निवडणूक लढविण्यास परवानगी दिल्याचे समजते आहे.
उद्धव ठाकरे सध्या सुट्टीसाठी युरोपात गेले आहेत. पुढील दोन दिवसात उद्धव भारतात परतणार आहेत. उद्धव ठाकरे मंगळवारीच भारतात परतणार होते. मात्र त्यांनी दोन दिवस मुक्काम वाढवला आहे. त्यामुळे, विजय पाटील यांनी सोमवारी रात्री उद्धव यांच्यासमवेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीबाबत प्रदीर्घ चर्चा करून सत्ताधारी पवार-महाडदळकर गटाविरोधात क्रिकेट फर्स्ट गटाच्या माध्यमातून आव्हान उभा करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.
विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट या गटाच्या पाठीशी शिवसेनेने मुंबई क्रिकेटमधील सर्व ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पाटील कुटुंबियांचे शरद पवार यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंध पाहता विजय पाटील यांनी पवारांविरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवू नये असे प्रयत्न केले जात आहेत. स्वत: विजय पाटीलही अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरावे की नाही याबाबत द्विधा मनस्थितीत होते. त्यामुळे आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असूनही विजय पाटलांच्या क्रिकेट फर्स्ट गटाकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी विजय पाटलांना निवडणूकीस उतरण्यास परवानगी दिली आहे तसेच सेनेची सर्व क्रिकेट फर्स्ट गटामागे उभी राहील असे ग्वाही दिली आहे. त्यामुळे आज दिवसभरात सर्वांची चर्चा करून निवडणुकीची फेरमांडणी करून विजय पाटील दुपारी तीननंतर अध्यक्षपदाचा अर्ज दाखल करतील असे समजते आहे. पाटील गटाकडून शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे व ठाण्यातून आमदार प्रताप सरनाईक हे निवडणूक लढविणार आहेत. तर पवार गटाकडून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे रिंगणात उतरणार आहेत. खासदार रामदास आठवले यांनीही निवडणुकीत उडी घेतली आहे.
विजय पाटील हे डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव आहेत. नवी मुंबईत त्यांनी भव्य असे डी वाय पाटील स्टेडियमची उभारणी केली आहे. तसेच 2011 पासून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.