मुंबई - उद्योगपती नेस वाडियाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करणारी अभिनेत्री प्रीती झिंटाचा जबाब मंगळवारी नोंदवण्यात आला. मुंबई पोलिसांनी तिला वानखेडे स्टेडियममध्ये येण्यास सांगितले होते. तिथे त्यांनी प्रीतीकडून घटनाक्रम जाणून घेतला. गँगस्टर रवी पुजारीला ओळखतेस काय, अशी विचारणा पोलिसांनी तिच्याकडे केली. रवी पुजारीशी कधी बोलणे झाले काय? या प्रश्नावर प्रीतीने पोलिसांना दिलेले उत्तर समजू शकले नाही.
याप्रकरणी नेस वाडियाचे वडील नस्ली वाडियांना रवी पुजारीकडून धमकीचा फोन आला होता. त्यात त्याने वाडिया कुटुंबाला प्रीतीपासून दूर राहण्यास सांगितले होते. आपले म्हणणे न ऐकल्यास परिणाम भोगण्याची धमकीही दिली होती.
मुंबईत 30 मे रोजी आयपीएल सामना झाला होता. यावेळी नेस वाडियाने विनयभंग केल्याची तक्रार प्रीतीने दिली होती. त्यानंतर ती अमेरिकेला गेली होती. मंगळवारी तिचा जबाब पुन्हा नोंदवण्यात आला. प्रीती आपल्या वकिलांसोबत वानखेडे स्टेडियममध्ये आली होती. स्टेडियममधील बीसीसीआयच्या कार्यालयात 8.20 वाजता जबाब नोंदवला.
प्रीतीने आपल्या मित्रांसाठी किती आसने बुक केली होती, तसेच नेसने बुक केलेल्या आसनांची संख्या तिला विचारण्यात आली होती.