मुंबई - हैदराबाद येथील एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ‘मकडी’फेम अभिनेत्री श्वेता बासू प्रसादला हैदराबाद येथील सत्र न्यायालयाने क्लीन चिट दिल्यानंतर तिने प्रसारमाध्यमांना उद्देशून खुले पत्र लिहिले आहे.
पत्रात श्वेता म्हणते, ‘प्रसारमाध्यमांनी माझे आयुष्य उध्वस्त केले’ आहे. माध्यमांनी मी अनेकदा चुकीच्या संधी करिअरमध्ये निवडल्या. त्यामुळे माझी आर्थिक स्थिती बिघडली. सर्वच दरवाजे जेव्हा बंद झाले तेव्हा काही लोकांनी मला वेश्याव्यवसाय निवडण्याचा सल्ला दिला. मी असहाय्य होते. मला दुसरा कुठलाच मार्ग उपलब्ध नव्हता, अशा प्रकारे वार्तांकन करणे म्हणजे ८० च्या दशकातील चित्रपटांमधील संवाद लिहिण्यासारखे आहे. माझ्या कुटुंबाने, माझ्या मित्रांनी मला कधीच असा मार्ग पत्करण्यासाठी मला प्रोत्साहन दिले नाही किंवा सल्ला दिला नाही.
२३ वर्षाची मुलगी स्वत:च्या पायावर उभी राहू शकते, चांगल्या मार्गांनी कमावू शकते हा माझ्या कुटुंबाला विश्वास होता. नंतर हळूहळू समाजालाही तो कळाला. मूळात मी या व्यवसायात अडकले किंवा असे ‘स्टेटमेंट’ प्रसारमाध्यमांना दिले नव्हते. मला तशी संधीच मिळाली नाही. मग प्रसारमाध्यमांनी नेमके कुणाचे वक्तव्य छापले, असा सवाल तिने माध्यमांना केला आहे. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा एका पुरस्कार सोहळ्यासाठी तिथे राहिले होते. दाक्षिणात्य चित्रपट केल्यानंतर माहितीपटांमध्ये काम तसेच लघुपटांच्या सहनिर्मितीत व्यस्त असताना आर्थिक चणचणीमुळे वेश्याव्यवसायाचा मार्ग पत्करल्याचे माध्यमांचे म्हणणे धादांत खोटे असल्याचेही श्वेताने पत्रात म्हटले.
आरोप सिद्ध करून दाखवावेत
३० ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यासाठी गेले असता तेथील काही लहान मुलांना संगीत शिकवण्याचा आनंदही लुटला. या पुरस्कारासंबंधीचा ईमेलही अजून
आपल्याकडे असल्याचे सांगत श्वेताने सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे प्रसारमाध्यमांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान श्वेताने दिले आहे.