आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical, Expert Come With Ambulance Within 20 Minutes

वैद्यकीय यंत्रसामग्री, निष्णांत डॉक्टरांसह रुग्णवाहिका 20 मिनिटांत येणार दारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हजारो गावांमध्ये आजही योग्य आरोग्य सुविधा पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. त्यानुसार आता शहरांपासून ते दुर्गम खेड्यांपर्यंत कुठूनही रुग्णाने फोन केल्यास अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री व निष्णांत डॉक्टरांसह सज्ज असलेली रुग्णवाहिका अवघ्या 20 मिनिटांत दारी पोहोचणार आहे.


या योजनेसाठी आरोग्य विभागाने महाराष्ट्राच्या नकाशावरील 937 ठिकाणे निवडली असून त्या ठिकाणी या रुग्णवाहिका 24 तास सज्ज असणार आहेत. यापैकी 690 रुग्णवाहिकांमध्ये 35 विविध प्रकारांची वैद्यकीय अद्ययावत यंत्रसामग्री असणार आहे. तर 247 रुग्णवाहिकांमध्ये यापेक्षाही अधिक सामग्री असणार आहे. यात व्हेंटिलेटर मशीनपासून ते मध्यम शल्यचिकित्सा करण्यासाठी अत्यावश्यक अशा सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच या सर्व अ‍ॅम्ब्युलन्स जीपीआरएस व वायरलेस सिस्टिमने कॉल सेंटरशी सतत संपर्कात राहणार आहेत.


पुण्यात कॉल सेंटर
या रुग्णवाहिकांवर नियंत्रणासाठी पुण्यातील औंधच्या रुग्णालयामध्ये एक कॉल सेंटर उभारले जात आहे. या ठिकाणी 24 तास निष्णांत डॉक्टरांची टीम असेल. इलाज करताना रुग्णवाहिकेतील डॉक्टरला गरज पडल्यास ही डॉक्टरांची टीम मार्गदर्शन करेल. अपघात, हल्ल्यातील जखमींवर उपचारापूर्वी पोलिस परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे कॉल सेंटरमध्ये पोलिसांचीही टीम नेमण्यात येणार असून रुग्णाला तत्काळ उपचार मिळावेत यासाठी गरज पडेल तेथे रुग्णवाहिकेसोबत पोलिसांची गाडीही घटनास्थळी पोहोचणार आहे.


फेब्रुवारीपासून सुरुवात
ही योजना दोन वर्षांपूर्वीच राज्य सरकारने अमलात आणण्याचे ठरविले होते. यासाठी निविदाही प्राप्त झाल्या होत्या. मात्र ज्या दोघांच्या निविदा नाकारल्या, त्यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च् न्यायालयात धाव घेतली होती. उच्च् न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिल्यावर यातील एकाने पुन्हा सर्वोच्च् न्यायालयात दाद मागितली. आता सर्वोच्च् न्यायालयानेही सरकारच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे हे काम युनायटेड अ‍ॅम्ब्युलन्स कंपनी, लंडन यांना देण्यात आले आहे. पुढील महिन्यात पहिली रुग्णवाहिका तयार होणार असून तिच्या सर्व चाचण्या पुणे येथील ट्रान्सपोर्ट इन्स्टिट्यूट तसेच औंध रुग्णालयातील तज्ज्ञांच्या मदतीने होणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ही सेवा राज्यातील जनतेसाठी खुली होणार आहे.


महिलांसाठी मोफत सेवा
राज्य सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. रुग्णांना अत्यंत अद्ययावत सेवा देण्यात यावी, असे आरोग्य खात्याचे धोरण आहे. नव्या रुग्णवाहिका आल्यावर जुन्यांची डागडुजी व रंगरंगोटी करून त्या गावागावांतील गरोदर महिलांना घर ते प्रसूतिगृह व प्रसूतिपश्चात बाळ-बाळंतिणीला प्रसूतिगृह ते घर अशी वाहतूक सेवा मोफत पुरवण्यासाठी देण्यात येणार आहेत. सुरेश शेट्टी, आरोग्य मंत्री